पुणे : पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. (Pune Ganeshotsav 2023)याची साक्ष देणारी एक वास्तू म्हणजे भाऊसाहेब रंगारी वाडा. स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणजे हा वाडा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहित आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. 


भाऊसाहेब रंगारी इथे राहत नव्हते पण इंग्रजांशी लढण्यासाठी क्रांतिकारकांना जागा मिळावी यासाठी हा वाडा होता. त्याकाळी इथ गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शास्त्र लपवायला जागा होती आणि याचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी करण्यात आला आणि पूर्वी जसा वाडा होता तसाच वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला आहे. आपल्या इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला कळावे यासाठी हा वाडा उभारण्यात आला आहे. 


हा वाडा खरंतर दवाखाना म्हणून ओळखला जायचा कारण भाऊ रंगारी हे राजवैद्य होते. मात्र इथ क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी व्हायच्या. 1892 साली भाऊसाहेब रंगारी यांनी आणि त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी याच भवनात बसून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. वाड्याचं नुतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही आहे. सगळं होतं तसंच ठेवण्यात आलं आहे, असं भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी सांगितलं आहे. आपल्या पिढीला या सगळ्याबद्दल कळावं यासाठी जीर्णोद्धार करण्यात आला आणि आपला वारसा, इतिहास संस्कृती कळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचंही ते सांगतात.


भाऊसाहेब रंगारींना रंगारी नाव कसं पडलं?


भाऊसाहेब रंगारी यांचं मूळ नाव भाऊ लक्ष्मण जावळे होते. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचं महत्त्वाचं नाव मानलं जातं. भाऊसाहेब हे त्याकाळी राजवैद्य होते. शालूंना रंग देण्याचा त्यांचा पारंपारिक व्यावसाय होता. त्यावरुन त्यांना रंगारी हे उपनाव पडलं. शालुंवरुन त्यांचं दुकान असलेल्या बोळीला शालुकर बोळी असं नाव पडलं होतं. त्याकाळच्या क्रांतीकारी चळवळींमध्ये भाऊसाहेबांचा सक्रिय सहभाग होता. 


संहार करणारी मूर्ती


हा गणपती चार हातांचा आहे. गणपतीने राक्षसाचा एक हात सोंडेत धरलेला आहे. गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हाती धरलेला आहे आणि एका हाताने राक्षसाचे केसदेखील पकडले आहेत, एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशाची मूर्ती आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि अनंत चतुर्थीला थेट बैलगाडीमधून या गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. 


 इतर महत्वाची बातमी-


'दगडूशेठ'चा निर्णय वैयक्तिक, आमची मिरवणूक 6 नंतरच, पुण्यातील चार मोठ्या मंडळांचा निर्धार