पुणे : समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर (Pune Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे त्यांच्यासह 3 जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर (Punyeshwar Temple) पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत. बेकायदेशीर आंदोलन आणि प्रक्षोभक भाषणं केल्यामुळे मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या होत्या. गुन्हा दाखल न केल्यास त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता.


4 सप्टेंबर रोजी पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवावे यासाठी महापालिकेबाहेर आंदोलन केलं होतं. चिथावणीखोर भाषण, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याचवेळी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील यावेळी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप होता. त्यानंतर नितेश राणे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. 4 सप्टेंबरला हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पुढील काही दिवस या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर आंदोलन होऊन 22 दिवस झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


मुस्लीम संघटनांचा आंदोलनाचा इशारा...


ही मंडळी जाणून बुजून फक्त आणि फक्त स्वत:चे राजकीय हेतू साध्य करण्याच्या हेतूने आणि पुण्यासारख्या शांत शहराचे वातावरण खराब करण्याच्या हेतूने जातीय तणाव निर्माण करण्यासाठी “पुण्येश्वर निर्माण समिती" सारख्या संघटना बनवून हिंदू-मुस्लीम समाजात तेढ आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मुस्लीम समाजाकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाचे आमदार असून देखील कुठल्याही स्वरुपाची सत्य आणि खरी माहिती न घेता सामान्य लोकांची दिशाभूल करत आहे. आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी भडकाऊ आणि चिथावणीखोर धमक्या देखील दिल्या आहेत, असं त्यांनी निवेदनात म्हटलं होतं. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करु असाही इशारा त्यांनी दिला होता.


पुणेश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याचा वाद जुना आहे. याच मंदिराचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच मंदिर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला होता. 


इतर महत्वाची बातमी-


CM Shinde Foreign Tour : काल आदित्य ठाकरेंचा बोचरा वार, आज मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरा पुढे ढकलला!