पुणे : लग्न जुळवण्यासाठी पूर्वी मध्यस्थ-नातेवाईक पुढाकार घ्यायचे. मध्यंतरीच्या काळात विवाह मंडळांकडे ही जबाबदारी सोपवली गेली. तर हल्ली डिजीटल प्लॅटफॉर्म विवाहबंध जुळवण्याचं काम करत आहेत. लगीनगाठी बांधणारी अशीच एक मॅट्रिमोनियल साईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप नगरसेवकाची परवानगी न घेताच भारत मॅट्रिमोनीने त्यांच्या लग्नाचे फोटो जाहिरात म्हणून वापरल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील भाजपचे नगरसेवक सम्राट थोरात यांनी भारत मॅट्रिमोनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या आयुष्यातील खाजगी सोहळ्याचा व्यावसायिक वापर करुन आपली फसवणूक केल्याचा आरोप 27 वर्षीय सम्राट यांनी केला आहे.
15 मे 2015 रोजी सम्राट थोरात पुण्यात ऐश्वर्या भोसलेसोबत विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.
ऐश्वर्या या शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या कन्या आहेत. तर सम्राट पुण्यातील गुरुवार पेठ (वॉर्ड क्र. 18) मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दोघांनाही राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे पालकांच्या पुढाकाराने हे नातं जुळलं होतं.
भारत मॅट्रिमोनीवर सम्राट यांच्या लग्नाचे फोटो पाहून नातेवाईक-मित्रांनी त्यांना फोन केले आणि तुम्हा दोघांची भेट मॅट्रिमोनियल साईटवर झाली का, अशी विचारणा केली. तेव्हा आपल्या परवानगीविना फोटो वापरले गेल्याचं सम्राट यांच्या लक्षात आलं. सम्राट यांनी भारत मॅट्रिमोनीचं होमपेज चेक केल्यावर दोघांचे फोटो पाहून ते अवाक झाले. इतकंच नाही, तर त्यांचं लग्न आपणच जुळवल्याचा दावाही वेबसाईटवर करण्यात आला होता.
सम्राट थोरातांनी भारत मॅट्रिमोनीचे मॅनेजर आणि आयकॅफे मॅनेजरविरोधात कलम 379 (चोरी), 420 (फसवणूक), 406 (गुन्हेगारी पातळीवर विश्वासघात) 499 (प्रतिमा मलीन करणे) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. खडक पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.