इंदापूर(पुणे) : इंदापुरात पत्नीचं डोहाळे पुरवणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं. पत्नीसाठी कैऱ्या तोडल्याने पतीसह पत्नीवरही लाकूड आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये जाधव दाम्पत्य गंभीर जखमी झालं आहे.


विश्वास जाधव आणि त्यांची पत्नी फलटणहून भिगवणला एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी घरी परताना या जोडप्याला रस्त्याच्या कडेच्या झाडाला कैऱ्या लगडलेल्या दिसल्या.

विश्वास जाधव यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कैऱ्यांची मागणी केली. पतीनं लागलीच झाडाच्या 2 कैऱ्या तोडल्या. मात्र कैऱ्या तोडल्याचं दिसताच शेताच्या मालकानं मुलासह घटनास्थळी धाव घेतली.

हुज्जतीनंतर विश्वास जाधव यांनी कैऱ्यांचे पैसे देण्याची तयारीही दर्शवली. मात्र चिडलेल्या देवकते आणि त्यांच्या साथीदारांनी दाम्पत्याला लाकूड आणि कुऱ्डाडीनं मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जाधव दाम्पत्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरु आहे.