Baramati News : पुण्याच्या (Pune) बारामतीमधील (Baramati) सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव दिल्याने सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला शरद पवार यांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आक्षेप घेतला आहे. कॉलेजला शरद पवार यांचे दिलेले नाव काढावे अशी मागणी सतीश काकडे यांनी केली आहे.
सभासदांना विश्वासात न घेता शरद पवारांचं नावं दिलं : सतीश काकडे
शरद पवार यांचे नाव द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते नाव देताना कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला आहे. संचालक मंडळाने नामांतराचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडायला हवा होता. परंतु संचालक मंडळाने जनरल बॉडीत हा निर्णय 2019 साली घेतला आणि हे शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये कळलं, असे सतीश काकडे यांचे म्हणणे आहे. पवार कुटुंबियांचा कारखान्याशी काहीही संबंध नसताना त्यांचं नाव कॉलेजला का द्यायचं, असा सवाल देखील काकडे यांनी विचारला आहे.
ट्रस्टच्या माध्यमातून पैसे दिल्याने शरद पवार यांचं नाव
शरद पवार यांनी पवार ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संस्थेला तीन कोटी रुपये दिल्याने त्यांचं नाव देण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शिक्षण निधी म्हणून जवळपास 70 ते 75 कोटी रुपये निधी घेतला आहे. शरद पवारांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोटी रुपये दिले म्हणून त्यांचं नाव द्यायचं का असा सवाल काकडे यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांचे कॉलेजला दिलेले नाव काढावे, अशी मागणी काकडे यांनी केली. "हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळप्रसंगी मंत्रिमंडळात हा विषय नेणार आहे. जर कुठेही न्याय मिळाला नाही, दिलेले नाव काढले नाहीतर नाईलाजाने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असे काकडे यांनी सांगितले. तसेच आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वास देखील सतीश काकडे यांनी व्यक्त केला.
याविषयी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना विचारणा केली असता संचालक मंडळाने नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याला आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं म्हटलं आहे.
इतर महत्त्वाची बातमी