Pune Crime News :   व्यसनी मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) मावळ तालुक्यातील सुदुंबरे (Crime) गावात ही घटना घडली आहे. माहितीनुसार मुलाचा आणि वडिलांचा घरात वाद झाला. त्यानंतर वडिलांनी मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. समीर बाळू बोरकर असं मुलाचं नाव आहे. या प्रकरणी वडील बाळू बबन बोरकर यांना अटक करण्यात आली आहे. समीर यांच्या भावजयीने या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे. 


पोलिसांनी (Pune Police News)दिलेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलात घरात काही कारणास्तव वाद झाला. वडील बाळू हे गावात शेती आणि पशुपालन करतात. त्यांच्या मुलगा समीर कोणताही कामधंदा करत नाही. शिवाय समीर दारुच्या आहारी देखील गेला होता. दारुच्या व्यसनामुळे समीरचं लग्न जुळत नव्हतं. या कारणावरुन घरात कायम वाद निर्माण व्हायचे. बाळू यांची थोरली सून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात स्वयंपाक करत होती. त्या वेळी समीर हॉलमध्ये झोपला होता. बाळू अचानक घरी आले. त्यांनी कुऱ्हाडीने समीरच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. समीरच्या भावजयीने हॉलमध्ये जाऊन पाहिलं असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 


लग्नावरुन झाला होता वाद
मुलगा व्यसनी होता. त्यामुळे मुलाचं आणि वडिलांची घरात रोज भांडणं व्हायची. यावरुन अनेकदा वाद टोकाला जायचे. व्यसनामुळे लग्नकार्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे घरातील वातावरण खराब झालं होतं. या सगळ्या गोष्टींना वैतागून वडिलांनी मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली आणि हत्या केली. 


कौटुंबिक वादातून हत्येच्या प्रमाणात वाढ
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येतात. त्यात कौटुंबिक वादातून आणि जमिनीच्या वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याची घटना घडली होती.  येरवडा येथील जवान नगरजवळ पतीने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीचा चाकूने वार करून हत्या केली होती. अंकिता अनिल तांबूटकर असं हत्या केलेल्या 45 वर्षीय महिलेचं नाव होतं. अनिल मनोहर तांबूटकर असे आरोपी पतीचे नाव  होतं. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.