पुणे: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही दुसरी बैठक असेल. 


राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच आयोगाच्या कामकाजासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि कामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच ओबीसी संघटनांच्या मागण्याच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त पत्रावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.


राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या आधीच्या बैठका राजीनामा आणि नाराजीसत्रामुळे गाजल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला जेष्ठ सदस्य आणि माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम अनुपस्थित राहणार आहेत. न्या. मेश्राम हे आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने बैठकीला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे


सुनील शुक्रे मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष


गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार करत काही सदस्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उगारलं. आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर शेवटी आयोगाचे अध्यक्ष आनद निरगुडे यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली. 


निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी गेली दहा वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले असून या वर्षी 24 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झालेत.  मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी जे निवृत्त न्यायाधीश अंतरवाली सराटीमध्ये गेले होते त्यामध्ये सुनील शुक्रे यांचा समावेश होता. 


तीन नवीन सदस्यांची नियुक्ती 


संजीव सानावणे यांच्या जागी मच्छिंद्रनाथ मल्हारी तांबे, लक्ष्मण हाके यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी सरकारने मारुती शिकारे आणि बालाजी किल्लारीकर यांनी आरोप करत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी ओमप्रकाश शिवाजीराव जाधव यांची नियुक्ती केली आहे. 


ही बातमी वाचा: