पुणे : पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडके याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयातील एक फोटो व्हायरल झाला आहे. बाबा बोडके हा पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड असून, त्याच्यावर एकूण 12 गुन्हे आहेत. यामध्ये 3 हत्येचे गुन्हे असून, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल आहे.


बाबा बोडकेची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?

बोडके टोळीचा प्रमुख बाबा बोडकेवर एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये हत्येप्रकरणी तीन हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश असून, खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, हत्येचा प्रयत्न असेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. 12  पैकी 11 गुन्ह्यांमधुन कनिष्ठ न्यायालयाकडून सुटका झाली आहे. मात्र, एक गुन्हा अद्याप प्रलंबित आहे. 2003 मध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते.



भाजपकडून नगरसेवक होण्याच्या प्रयत्नात?

बाबा बोडके भाजपकडून नगरसेवक होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णींसोबत फ्लेक्सवर बाबा बोडकेचा फोटो झळकले होते, मात्र, बाबा बोडके अद्याप भाजपचा अधिकृत सदस्य नाही.

राष्ट्रवादीकडून एकाच दिवसात हकालपट्टी!

बाबा बोडकेला अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभेत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. मात्र, माध्यमातून त्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीने एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढलं होतं.

मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण

"नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर हावरे या अॅप उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्ती तिथे होती आणि तेव्हाच हा फोटो काढला गेला. मात्र, बाबा बोडके कोण आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती.", असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यलायाने दिले आहे.