पुणे : पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्र के अत्रे यांच्या हस्ते 1962 रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. हा पुतळा उभारताना, त्यावेळी अत्रे काय म्हणाले होते, त्या भाषणाचा ऑडिओ एबीपी माझाला मिळाला आहे.


पुण्यातील संभाजी उद्यानात 23 जानेवारी 1962 रोजी राम गणेश गडकरींचा अर्धपुतळा बसवण्यात आला. गडकरींच्या स्मृतीदिनी त्यांचेच शिष्य प्रल्हाद केशव अत्रे अर्थातच आचार्य अत्रेंच्या हस्ते हा पुतळा बसवण्यात आला. महाराष्ट्रातील गडकरींचा हा पहिला अर्धपुतळा होता.

आचार्य अत्रे गडकरींच्या तालमीत तयार झाले होते. त्यांनी तसा उल्लेख आयुष्यभर केला होता.

प्र के अत्रे यांच्या भाषणातील काही भाग जसाच्या तसा

पुणे मनपाचे महापौर श्रीमती रमाबाई गडकरी आणि पुण्यामधील सन्माननीय आणि रसिक नागरिक बंधू भगिनींनो,

मघाशी महापौरांनी सांगितल्याप्रमाणं एक महान ऐतिहासिक घटना आज याठिकाणी घडली आहे.  आपल्या महाराष्ट्राचे एक महान साहित्यकार, मराठी रंगभूमीवर नवयुग प्रवर्तणारे असे स्वतंत्र प्रतिभेचे नामवंत नाटककार आणि महाराष्ट्रामध्ये श्रीपाद कोल्हटकरांनी आणलेल्या विनोदाच्या तत्वज्ञानाचा घरोघरी प्रचार करणारे विनोदपंडीत राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज या संभाजी उद्यानामध्ये, या पुण्यपतनामध्ये आज उभारला जात आहे. याप्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं, हा माझा आयुष्यातला मी सर्वात मोठा सन्मान समजतो.

मी आजपर्यंत मान काही कमी मिळवले नाहीत. अनेक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. नाट्य संमेलनाचा होतो, पत्रकार संमेलनाचा, कवी संमेलनाचा अध्यक्ष होतो, राष्ट्रपती यांचं उत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णपदक मिळवणारा मी होतो. पण या सर्व सन्मानापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशाप्रकारचा सन्मान आज माझ्या गुरुचा पुतळा उघडायला सांगून केला आहे. त्याबद्दल मी महापालिकेचा आणि महापौरांचा अतिशय ऋणी आहे. त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.

गडकऱ्यांना जाऊन 42 वर्ष झाली. 23 जानेवारी 1919 रोजी रात्रौ 10 वा. वऱ्हाडमध्ये पावणे या गावी त्यांचं आवसन झालं. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. आयुष्य महाराष्ट्रात-पुण्यात गेलं, आणि आवसाण विदर्भात झालं. अशी त्यांच्या जीवनाची चिरस्थयी झाली. तथापि पुणे ही त्यांची कर्मभूमी यात शंका नाही.

निळूभाऊंनी सांगितंलं त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आलेला नाही. त्या वादात मी शिरु इच्छित नाही. पण गडकऱ्यांची अशी इच्छा होती, की माझी समाधी जर कोणी बांधली, तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी माझी समाधी बांधली जावी. जेणेकरुन फर्ग्यूसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायधूळ माझ्या समाधीला लागावी. त्यामुळे महापालिकेनं संभाजी उद्यानात हा पुतळा उभारुन त्यांचा सन्मान केल्याची भावना आचार्य अत्रेंनी व्यक्त केली.

शेवटी अत्रे म्हणतात,

जसा रणांगणावर वीर लढता लढता मरतो, तसे गडकरी हे नाट्यलेखन करता करता अंतर्धान पावले. राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज या संभाजी उद्यानामध्ये उभारला जात आहे. याप्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान समजतो.

व्हिडीओ :