पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं आहे. तर याबाबत भाजप आमदार अश्विनी जगताप यांना स्पष्टीकरण दिलं आहे.


चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र आहे. असा दावा करत मी भाजपकडूनच चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं अश्विनी जगतापांनी ठामपणे सांगितलं आहे. माझे दिर शंकर जगताप आणि माझ्यात कोणते ही वाद नाहीत. त्यामुळं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर मी त्यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणेन. असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे. 


एबीपी माझाशी बोलताना भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, या चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये काहीह तथ्य नाही. कोणीतरी या चर्चा सुरू केल्या आणि बाकी विरोधक या चर्चांना खत-पाणी खालत आहेत. लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना, ऑक्सीजन लावून ते मतदानासाठी उपस्थित राहिले होते. त्यांनी ज्या पक्षाची निष्ठा राखली, ती निष्ठा आम्ही कोणीच मोडणार नाही, लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, पक्षाने संधी दिली त्यामुळे मी पक्षाला सोडणार नाही, असंही अश्विनी जगताप यांनी म्हटलं आहे.


तिकिट कोणालाही मिळोत, मी पक्षाचा आदेश मानणार आहे, ते ज्याला संधी देतील त्याला माझा पाठिंबा असणार आहे. विरोधक हे करणं थांबवलं पाहिजे, शंकर जगताप यांच्यासोबत वाद होता का यावर बोलताना त्या म्हणाल्या आमच्यात कसलाही वाद नाही. आमचं एकत्र कुंटूब आहे. आमच्यात कसलाही वाद नाही, तर पक्षाने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर मी त्यांचा प्रचार करेन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन असंही आश्विनी जगताप यांनी म्हटलं आहे. 


राजकीय वर्तुळात कोणत्या चर्चा सुरू?


दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी झालेल्या पोट निवडणुकीत अश्विनी जगताप आमदार झाल्या, मात्र तेव्हा त्यांचे दिर शंकर जगताप ही देखील इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी शंकर जगतापांना थांबण्याची आणि पुढं तुम्हाला संधी देऊ. असा शब्द दिला होता, असं नेहमी बोललं जातं. ती संधी या विधानसभेत शंकर जगतापांना मिळणार, असंच सध्याचं चित्र आहे.


 हे अश्विनी जगतापांना (Ashwini Jagtap) लक्षात आल्यानं त्या त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन, करू शकतात अशी चर्चा सध्या शहरभर रंगलेली आहे. त्यांच्या समर्थकांसह अश्विनी जगताप राष्ट्रवादीचं दार ठोठावत आहेत, शरद पवार त्यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात प्रवेश देण्याबाबत विचार करू शकतात आणि कदाचित दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळू शकते.लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातमध्ये दोघांना तिकीट मिळणं अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जाते. 


चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विजयी


लक्ष्मण जगताप आमदार असताना त्यांचं निधन झालं, त्यानंतर पार पडलेल्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भरघोस मतांनी चिंचवडकरांनी निवडून दिले. आता मात्र या जागेसाठी एकाच कुटुंबातील दोन जण इच्छुक असल्याने पक्षासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे अश्विनी जगताप वेगळा विचार करण्याची तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.