पुणे : सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. अशातच आज पहाटे हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल (शुक्रवारी) बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.


दरम्यान, "दिंडी निघाली आहे, आता थांबणं शक्य नाही, पायी वारी पूर्ण करणारचं", असं सांगत बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी संदर्भातील आपली भूमिका शुक्रवारी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केली होती. पायीवारी करण्यासाठी आपण आळंदीत दाखल होणार असा इशारा बंडातात्यांनी दिला होता. कराडकरांच्या इशाऱ्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात होते. परंतु, बंडाताता कराडकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. अशातच आज पहाटे काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. त्यावेळी या वारकऱ्यांना सोडवण्यासाठी दाखल झालेल्या बंडातात्या कराडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी, यंदाही पायी वारी सोहळा नाही : अजित पवार


आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जारी करताना अजित पवार म्हणाले होते की, "आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केलेली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. परंतु, पायी वारी सोहळ्याला परवानगी न देता. या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या 10 मानाच्या पालख्यांना 20 बसच्या माध्यमातून पंढरपुरात जाता येणार आहे"