पुणे : आतापर्यंत कधीही झाला नव्हता असा बदल यावेळी अकरावीच्या प्रवेशावेळी पाहायला मिळतोय . यावेळी सायन्सपेक्षा आर्ट्सला अॅडमिशन घेण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचा कल दिसून येतोय . त्यामुळं फर्ग्युसन, एस. पी., मॉडर्न , गरवारे या आणि इतरही महाविद्यलयांमध्ये सायन्सपेक्षा यावेळी आर्टसची कट ऑफ लिस्ट वरचढ ठरलीय. करिअरबद्दल आजचे तरुण नक्की काय विचार करतायत हे यातून दिसून येतंय. शिक्षण क्षेत्रातील हे बदल एका अर्थानं आपल्या देशातील बदलेली आर्थिक परिस्थिती आणि नोकऱ्यांच्या संधींमध्ये झालेले बदलही दर्शवत आहे.


पुण्यातील नामवंत महाविद्यलयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विदयार्थ्यांची चढाओढ तर दरवर्षीच पाहायला मिळते . पण मागील वर्षीपर्यंत ही चढाओढ डॉकटर किंवा इंजिनियर बनण्यासाठी सायन्सला अॅडमिशन घेण्यासाठी असायची . पण यावर्षी पहिल्यांदाच ही चढाओढ इंग्रजी माध्यमाच्या आर्ट्सला अॅडमिशन घेण्यासाठी दिसून येते. ज्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण आहेत असे विद्यार्थी सायन्स ऐवजी आर्टसची निवड करत आहे. काही महाविद्यलयांमध्ये तर आर्टसची कट ऑफ लिस्ट 97 टक्क्यांच्याही पुढं पोहचली आहे . प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे यांच्या मते आतापर्यंत कधीच आर्ट्सची कट ऑफ लीस्ट सायन्सपेक्षा वरती गेली नव्हती. डॉक्टर एकबोटेंच्या मते आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांना नक्की काय बनायचंय याबद्दल स्पष्टता असते. आधी पदवीनंतर मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात करायची . पण यावेळी दहावीनंतरच मुलं त्यांना सरकारी अधिकारी बनायचं आहे हे ठरवून अकरावीलाच आर्ट्सला प्रवेश घेत आहेत. पुण्यातील सर्वच प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा ट्रेंड दिसून येतोय .


फर्ग्युसन महाविद्यालय -  ( सायन्स कट ऑफ) 484 , (आर्ट्स कट ऑफ) 487
एस . पी . महाविद्यालय - (सायन्स कट ऑफ) 476 , (आर्ट्स कट ऑफ ) 479
मॉडर्न महाविद्यालय - ( सायन्स कट ऑफ) 474 , (आर्ट्स कट ऑफ)- 475
सेंट मीराज ज्युनियर कॉलेज - (सायन्स कट ऑफ) -459 , (आर्ट्स कट ऑफ) 460


पुण्यातील आबासाहेब गरवारे, जोग प्रशाला, आपटे प्रशाला, शामराव कलमाडी हायस्कुल या इतर महाविद्यलयांमध्येही सायन्सपेक्षा यावर्षी आर्ट्सची कट ऑफ लिस्ट वरचढ ठरल्याचं दिसून येतंय .



पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्रसिंग परदेशी यांच्या मते, आर्ट्सच्या कट ऑफ लिस्टमध्ये झालेली वाढ ही फक्त इंग्रजी माध्यमापुरती मर्यादित नाही तर ज्यांना मराठी माध्यमातून आर्ट्स किंवा कला शाखेचे शिक्षण घ्यायचंय त्यांच्या कट ऑफ लिस्टमध्येही वाढ झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत विद्यर्थ्यांचा ओढा सायन्सकडे, त्यानंतर कॉमर्सकडे आणि या दोन शाखांमध्ये प्रवेश नाहीच मिळाला तर मग आर्ट्सला प्रवेश घेण्याकडे असायचा . त्यामुळं महाविद्यलयांमध्येही सायन्सच्या तुकड्या सर्वाधिक असायच्या. पण यावर्षी दिसून आलेला ट्रेंड इथून पुढंही कायम राहिला तर आर्ट्सच्या तुकड्या वाढवण्याची वेळ महाविद्यालयांवर येऊ शकते. पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या मते कला शाखेला प्रवेश घेतल्यानंतर विद्यर्थ्यांना मोकळा वेळ बराच मिळतो . त्याचा उपयोग ते त्यांचा एखादा छंद जोपासण्यासाठी करू शकतात. परंतु ज्यांना 90- 95 टक्क्यांहून अधिक गुण असलेली मुलंही आर्ट्स निवडतात हे आपल्या समाजात होत असलेल्या बदलाचं निदर्शक आहे. भरपूर गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी आर्ट्सची निवड करण्यामागे पुढील महत्वाची कारणं दिसून येतायत.



आर्ट्सची निवड करण्याची कारणे :




  • ज्या विद्यर्थ्यांना यु .पी .एस . सी . किंवा एम.पी. एस.सी या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे असे विद्यार्थी अकरावीपासूनच त्याची तयारी करण्यासाठी आर्ट्सला एडमिशन घ्यायचं ठरवतायत.

  • आर्ट्सला प्रवेश घेतल्यावर सायकोलॉजी किंवा मानसशास्त्रात करियर करण्याची संधी अनेकांना खुणावतोय . बदलत्या जीवनशैलीसोबत येणाऱ्या ताणतणावांमुळे मानसोपचार तज्ज्ञांची गरज देशात आणि परदेशातही आहे.

  • राज्यातील इंजिनियरिंगच्या अर्ध्या जागा मागील काही वर्षांपासून रिक्त राहत आह. कारण इंजिनियर होऊन नोकरीची शाश्वती उरलेली नाही.

  • मेडिकलला प्रवेश घेऊन डॉक्टर बनायचं ठरवल्यास बारावीनंतर स्पेशलायझेशन करण्यासाठी किमान बारा वर्षे शिक्षण घ्यावं लागतं आणि तोपर्यंत वयाची तिशी उलटते .

  • आर्ट्स विषय घेऊन समाजशास्त्र किंवा आवडीच्या कुठल्याही विषयाचा अभयास करून पदवी मिळवणं शक्य आहे .


पूर्वा थिगळे या मुलीला दहावीला 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेत . मात्र पुढं जाऊन मानसोपचार तज्ज्ञ् बनायचं ठरवलंय असल्यानं तिनं आत्ताच मॉडर्न महाविद्यलयात आर्ट्सला प्रवेश घेतलाय . मानसोपचार तज्ज्ञांना देशात आणि विदेशातही मोठी मागणी आहे . त्यामुळं अनेकजण करिअर म्हणून मानसशास्त्र निवडत आहे. पूर्वप्रमाणे इतरांनीही हाच विचार करून मानसशास्त्राची निवड केली आहे . अनेकजण कला किंवा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचाही विचार करतात. त्यांच्यासाठी देखील आर्ट्स हा उत्तम पर्याय ठरत असल्याने आर्ट्सकडे येणाऱ्यांची संख्या वाढतेय. जेव्हा आपल्या देशात आय. टी. क्षेत्रात बूम होती. तेव्हा सॉफ्टवेअर इंजियर बनण्याकडे आणि परदेशात नोकरी पटकावण्याकडे तरुणांचा कल होता . त्यानंतर आय टी क्षेत्रात साचलेपण यायला लागल्यावर कॉमर्सला प्रवेश घेऊन एम .बी .ए .किंवा मॅनेजमेंटची एखादी पदवी घेण्याकडे विद्यर्थ्यांचा कल होता .पण आत्ता अर्थव्यवस्थेची नाजूक अवस्था पाहता मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी मिळेल का याबद्दल तरुणांमध्ये शंका होती . त्यामुळं पुन्हा एकदा साठ - सत्तरच्या दशकाप्रमाणे हुशार तरुण सरकारी नोकरी मिळवण्याकडे वळताना दिसतायत . हे बदल आपल्या अर्थव्यवस्थेची बदलेली अवस्थाही दाखवून देत आहे.