Pune Rain News: पुण्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून खासगी कंपन्याना 'वर्क फ्रॉम होम' द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेने ट्विट करत हे आवाहन केलं आहे. त्याच बरोबर सगळ्या नागरिकांना देखील सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.


ट्विटमध्ये काय लिहिलंय?


पुणे महानगरपालिका भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यात पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्या यांना आवाहन करण्यात येते की सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने, त्यांनी पुढील 2 दिवस त्यांचे अधिनस्थ कर्मचारीवर्ग यांना 'वर्क फ्रॉम होम करण्यासाठी प्रोत्साहित करावे,असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.



त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस दोन्ही शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळं आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.


प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 14 आणि 15 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 15 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.


अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी राहील. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असंही आदेशात सांगितलं आहे.