Ayurvedic cigarette: 'आजोबा, वडिल आणि मी आम्ही तिघेही आयुर्वेदाचा अभ्यास करतो. आजोबा आणि वडिल रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार देखील करायचे. एक दिवस वडिलांकडे एका व्यक्तीने आयुर्वेदिक बीडीची मागणी केली. वडिलांनी औषध वनस्पतींचा वापर करुन बीडी बनवली. मात्र अनेकांना चारचौघात बीडी फुकायला लाज वाटायची. लाज वाटणार नाही आणि आरोग्यही चांगलं राहिल, या हेतूने मी ही आयुर्वेदिक सिगारेट तयार केली, असं डॉ. राजस नित्सुरे सांगत होते.


पुण्याच्या डॉ. राजस नित्सुरे यांनी आयुर्वेदिक सिगारेट तयार केली आहे. विविध औषधी वनस्पतींचा वापर करुन ही सिगारेट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठातून डॉ. राजस यांनी BAMS केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी ayurved Pharmacy चा डिप्लोमा सुद्धा घेतला आहे. 1998 मध्ये त्यांनी या सिगारेटवर काम सुरु केलं होतं त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळालं. धुम्रपान आणि कर्करोगाचा धोका पाहुन त्यांनी या सिगारेटची निर्मीती केली आहे. 


आजोबा आणि वडिलांकडून मिळाली प्रेरणा


माझ्या तीन पीढ्या आयुर्वेदाचा अभ्यास करत आहोत. हे सगळं माझ्या आजोबांपासून सुरु झालं. त्यांना कफाचा त्रास होता म्हणून त्यांनी आयुर्वेदातील धुमपान नावाच्या संकल्पनेचा अभ्यास केला. त्यांना वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे वेगवेगळे चुर्ण आणून त्याचा धूर श्वासावाटे घ्यायचे. त्यामुळे त्यांचा कफ बाहेर पडायचा. त्यावेळी त्यांनी स्वत:साठी आणि रुग्णांसाठी काही चुर्णाचे मिश्रण विकसित केले होते. त्यानंतर धुमपानचा उपचार देखील ते रुग्णांवर करायला लागले.


"एका व्यक्तीने माझ्या वडिलांना आयुर्वेदिक बीडी बनवण्याची मागणी केली. त्यावेळी अशा प्रकारची बीडी कुठे उपलब्ध नव्हती. त्यानंतर वडिलांनी हा प्रयोग करुन बघितला. त्यांनी बीडी तयार केली. त्या बीडीमार्फत अनेकांचा कफाचा त्रास कमी झाला. औषध म्हणून ही बीडी आम्ही रुग्णांना देत होतो. मात्र रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर आम्ही अवाक झालो. या बीडीमुळे तंबाखूची तल्लफ जाते, अशा प्रतिक्रिया अनेकांकडून आल्या.", असं ते सांगतात



त्यानंतर डॉ. राजस यांच्या लक्षात आलं की या हर्बल बीडीमार्फत अनेकांची तंबाखूची सवय सुटू शकते.या बीडीमुळे आरोग्यावरही त्याचा परिणाम होत नव्हता, हे देखील निदर्शनास आलं. ही बीडी बघितल्यानंतर अनेकांनी डॉ. राजस यांच्याकडे सिगारेट बनवण्याची मागणी केली. हे सगळं 1998मध्ये घडत होतं. त्यानंतर अशा पद्धतीची सिगारेट उपलब्ध आहे का? आणि नसेल तर का नाही आहे?, यावर विचार करायला सुरुवात केली. मात्र अशी कोणतीच सिगारेट मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती.  त्यांनी या हर्बल सिगारेटवर संशोधन करायला सुरुवात केली. त्याचं पेटंट तयार केलं आणि 10 वर्षांनंतर हे पेटंट मंजूर झालं.


कशी केली वनस्पतींची निवड?
या सगळ्या दरम्यान दोन प्रकारचे रिसर्च होते. आयुर्वेदात धूमपानाची संकल्पना आहे. ही संकल्पना फार प्रचलित नाही. वनस्पतींचा अभ्यास करुन तंबाखू किंवा धुम्रपानाची सवय कशी नष्ट होईल?, याकडे लक्ष केंद्रीत केलं. कोणत्याही वनस्पतींचा वापर करुन तंबाखूची सवय जात नाही. त्यामुळे वनस्पती निवडणं, हे मोठं आव्हान होतं. वनस्पतींची निवड झाल्यानंतर भारतातील अनेक संशोधन केंद्रावर प्रयोग करण्यात आले. ज्या वनस्पतींचा वापर करुन सवय सुटण्यास मदत होईल, अशा वनस्पतींची निवड केली.


 




कोणत्या वनस्पतींचा वापर करण्यात आला?
या सिगारेटमध्ये आयुर्वेदातील महत्वाच्या आणि सहज उपलब्ध होईल, अशा वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.त्यात लवंग, पुदिना, दालचीनी, हळदीचं पान, कमळफुल, वाळा, ओवा, नागरमोथा या वनस्पतींचा वापर आयुर्वेदाच्या धुमपानात वापरल्या जातात. याच वनस्पतीचा वापर करुन हर्बल बीडी तयार करण्यात आली आहे. 


आयुर्वेदामधील धुमपान संकल्पना काय आहे?
प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध औषध वनस्पतीपासून तयार करण्यात येणाऱ्या धुराला धुमपान म्हणतात.धुमपान आणि धुम्रपान हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. त्यांच्या संकल्पनाही वेगळ्या आहेत. आयुर्वेदामध्ये दिनचर्या नावाचा प्रकार आहे. रोजच्या जगण्यात तुम्ही काय काय करावं, हे त्यात उत्तम सांगितलेलं आहे. त्यात तंदुरुस्त रहायचं असेल तर धुमपान करावं, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. धुम म्हणजे औषधाचा धूर (MEDICINAL SMOKE) पान म्हणजे श्वासावाटे धूर आत घेणे (TO INHALE). 


डॉ. राजनच्या या सिगारेटचं व्यसन लागलं तर..
डॉ. राजन सांगतात, तंबाखू हे आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. आयुर्वेदिक सिगारेट आम्ही निर्माण केली तरी देखील कोणत्याच प्रकारच्या स्मोकिंगला वाव देत नाही. हर्बल सिगारेट हे व्यसन सोडण्याचं एक साधन आहे. मात्र आम्ही कोणत्याच प्रकारच्या स्मोकिंगला समर्थन करत नाही. त्यामुळे तुम्ही आयुर्वेदिक सिगारेटचंही व्यसन लागू देऊ नका.


दोन प्रकारचे व्यसन 
मानसिक व्यसन आणि सवयीचं व्यसन असे दोन प्रकारचे व्यसनं असतात. त्यात एखाद्या गोष्टीची सवय लागणे. त्याशिवाय जीव कासाविस होणे, याला सवयीचं व्यसन म्हणतात. याच सवयीच्या व्यसनापासून ही हर्बल सिगारेट दूर ठेवण्यास मदत करते. 


ही सिगारेट कुठे उपलब्ध आहे?
ही सिगारेट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो या अॅपवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसंच काही पान शॉप आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील ही सिगारेट तुम्हाला मिळू शकेल.




पेटंट कसं मिळवलं?
मारुत आयुर्वेदीक सिगारेटवर आधी मार्केट रिसर्च करण्यात आलं. त्यानंतर 1998 मध्ये अशा प्रकारचं प्रॉडक्ट उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर डॉ. राजस यांनी आयुर्वेदिक सिगारेटवर रिसर्च करण्यास सुरुवात केली.त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला. इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर हा फार्म उपलब्ध असतो. त्यात आपल्या प्रॉडक्टबाबत सर्व माहिती द्यायची असते. उदा. आधी कोणी केलं आहे का?,त्याचे उपयोग काय आहे?, प्रोसेस कशी केली?, कोणत्यामुद्य़ांवर ही संकल्पना नवीन आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतात. डॉ. राजस यांनी 2010 मध्ये पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला होता.


त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांना आयुर्वेदिक सिगारेटचं पेटंट मिळालं.  या सगळ्या परिश्रमानंतर अखेर 2021 मध्ये त्यांना हर्बल सिगारेटचं पेटंट मिळालं. इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा फार्म उपलब्ध असतो. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया विभाग असतो. या विभागाअंतर्गत कोणत्याही नवीन संशोधनासाठी पेटंट दिलं जातं.