Pune News: पेट्रोलच्या किंमती वाढल्याने अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनाला पसंती देत आहेत. त्यात पुणे शहरात अधिक लोकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले आहे. स्वस्त आणि पुरक अशा या इलेक्ट्रिक वाहनाकडे पुणेकरांचा अधिक कल दिसतो आहे. मात्र या इलेक्ट्रिक वाहनांंसाठी चार्जिंग स्टेशनची सोय फार ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन धारकांची गैरसोय होत होती. हीच समस्या जाणून घेत महापालिकेच्या वाहनतळावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन बसवण्यात आले आहे. 


पुणे महानगरपालिकेच्या वाहनतळामध्ये  4 इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसविण्यात आले. सहज चार्जिंग सुविधेमुळे अधिकारी-कर्मचारी व अभ्यागतांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल. असेच आणखी चार्जिंग स्टेशन महानगरपालिकेसह इतर शासकीय कार्यालयात बसविण्यात येणार आहेत, महापालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे. 



प्रदुषणाला बसणार आळा
पुणे शहरातील 70 टक्के नागरीक वैयक्तिक दुचाकींचा वापर करतात. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होतेच मात्र त्याचबरोबर प्रदुषणाचं प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे अनेकदा शासनाकडून  इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पेट्रोलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. त्याला पर्याय म्हणून सध्या  इलेक्ट्रिक वाहनाकडे अनेकांचा कल आहे.


इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगचा प्रश्न
इलेक्ट्रिक वाहन अनेकांनी खरेदी केले मात्र त्याच्या चार्जिंगचा प्रश्न कायम तोंड वर काढून असतो. अनेकदा तासानुसार किंवा किलोमीटर नुसार हे  इलेक्ट्रिक वाहन काम करतात. त्यात मध्येच चार्जिंग संपलं तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते.


सध्या कमी किंमतीत मात्र महाग होण्याची शक्यता
कच्चा मालाची मागणी वाढली तर  इलेक्ट्रिक वाहन महाग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी भारतात कच्च्या मालाची कशी निर्मिती करता येईल याकडे अनेकांचं लक्ष आहे. देशात बॅटरी निर्मिती झाली  तरी देखील बॅटरीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालासाठी किंवा इतर भागासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागणार आहे.


पुण्यासह इतर लहान शहरांमध्ये देखील या  इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात  इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सोय करण्याची गरज आहे.