Pune Latest News Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील तळजाई टेकडीवर (Pune Taljai Tekadi) होणाऱ्या घाणीवरुन पुणेकरांना चिमटे काढले आहेत. आज सकाळी बोलताना अजित पवार म्हणाले की, तळजाई टेकडीवर येताना कुत्री घेऊन येऊ नका. त्याचा इथल्या प्राण्यांवर परिणाम होतो. त्याचे जे काही लाड करायचे ते घरी करा. अगदी बेडवर झोपवा. आमची काही अडचण नाही. पण इथे आणू नका. चार पाच बिबटे आणून सोडले तर सगळी कुत्री खलास करुन टाकतील. पण असं काही करणार नाही. पण तळजाईची काळजी आपण घ्यायला हवी, असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, तळजाईच्या टेकडीला कंपाऊंड करावे लागेल. भटकी कुत्री आतमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. कारण त्यामुळे टेकडीवरील ससे कमी झालेत, मोराला खातात, पक्षी उडून जातात. काहीजण स्वतःची कुत्री घेऊन येतात.  त्यांना कोणी विरोध केला तर ते कोर्टात जातात. पण वनविभागाने नियम केलाय की कोणत्याही प्रकारची कुत्री आणता येणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले की,  काही लोक वेडेपणा करतात आणि इथे डुकरं आणून सोडतात.  त्यामुळे झाडांवर परिणाम होतो.  तळजाईवर देशी पद्धतीची झाडे लावायला हवीत.  डस्टबीन आणि पेवरचे रंगही इथल्या वातावरणाला अनुरूप असे हवेत.  सिंहगड किल्ल्यावर ई व्हेईकलच्या माध्यमातून लोकांना ये जा करण्याची सोय करण्यात येईल, असंही ते म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, तळजाई टेकडीवर गाड्या खूप गाड्या येतात. त्यासाठी मागे गाड्यांना एक रुपया कर लावण्याचा निर्णय घेतला तर लगेच आंदोलन केले. घरुन शंभर रुपयांचं पेट्रोल खर्च करुन हा पठ्ठ्या इथे येतो पण एक रुपया द्यायला नको म्हणतो. पण पुणेकरांचा स्वभाव जगात पहायला मिळत नाही. मी पिंपरी-चिंचवडमधे सत्ता असताना धडाधड निर्णय घ्यायचो. इथे एखादा निर्णय घेतला की आधी कोर्टात जातो. मग चर्चेला येतात. चर्चेला आले की मार्ग सुटतात, असं ते म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, मी दर शुक्रवारी-शनिवारी पुण्यात असतो.  मी तळजाईला येत जाईन. आपण काही सुर्यमुखी नाही, त्यामुळे लवकर येऊ. आता माझ्यामुळे कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांना लवकर यावं लागतं.  पण पुणे हवं असेल तर लवकर यावं लागतं, असं ते म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha