Vertical Farming Pune: आजवर तुम्ही शेतीचे अनेक प्रकार पाहिले असतील. पण हे सर्व प्रकार केवळ मातीतील शेतीचेच असावेत? तुम्ही म्हणाल हा काही प्रश्न आहे का? शेती ही मातीविना होऊच शकत नाही, हेच आजवर आपण पाहत आलोय. पण, सध्या पुण्यात विनामातीच्या शेतीचा प्रयोग सुरू आहे. अगदी तुम्ही तुमच्या घरात देखील ही शेती करू शकता. भविष्यात तर नासा ही शेती मंगळ ग्रहावर करण्याच्या प्रयत्नात आहे. 


व्हर्टिकल फार्मिंग अर्थात उभ्या पाईपमधील या अनोख्या शेतीनं हे शक्य झालंय. पुण्याच्या लोणावळ्यात शेतीचा हा नवा प्रयोग प्रवीण शर्मा यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. बारा गुंठ्याच्या या क्षेत्रात सध्या दोन एकर क्षेत्राचं पीक बहरत आहे. व्हर्टिकल फार्मिंग अर्थात उभ्या पाईपच्या या अनोख्या शेतीमुळं हे शक्य झाले आहे. जमिनीवर एक रोपाच्या लागवडीला जेवढी जागा लागते, तेवढ्याच जागेत या शेतीत 108 रोपांची लागवड करण्यात आलीये. त्यामुळे जमिनीवरील दोन एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत अवघ्या बारा गुंठ्याच्या या शेतीतून चौपट उत्पन्न मिळत आहे. 


विनामातीची ते ही हवेत पिकणारी ही शेती नासाच्या ही पसंतीला उतरलीये. त्यामुळे संशोधनासाठी मंगळ ग्रहावर जाणाऱ्या संशोधकांची भूक भागविण्यासाठी, नासा मंगळ ग्रहावर असे पीक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असा दावा प्रवीण शर्मा यांनी केला आहे. 


चेरी टोमॅटो, बटाविया लेटस, लोलोरोसो लेटस, कर्लीकेल, इंग्लिश बेबी काकडी, भूत जोलकिया अशी इथं विविध पिकं घेतली गेली आहेत. आता लवकरच ही पिकं घराघरात घेणं शक्य होणार आहे, त्यांचं ही संशोधन अगदी अंतिम टप्प्यात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 


वाढत्या लोकसंख्येमुळं शेत जमिनीवर सिमेंटची जंगलं झपाट्याने उभी राहतायेत. परिणामी पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस मोठी घट होऊ लागलीये. भविष्यात तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यावेळी शेत जमीन अत्यल्प असेल तेंव्हा हीच एरोपॉनिक शेती सर्वांची भूक भागवेल. त्यामुळं या अनोख्या शेतीला शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवं असेही म्हटलं जात आहे.