Amazon India Layoffs: ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्याच्या कामगार आयुक्तांनी कर्मचारी कपातीबाबत ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला नोटीस पाठवली आहे. वोलंट्री सेपरेशन पॉलिसी राबवून कर्मचाऱ्यांना काहीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे कामावरुन काढून टाकलं आहे, असा आरोप कंपनीवर केला आहे. 


कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करण्यासाठी काही अटी आहेत किंवा त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारच्या परवानगीशिवाय कामावरून कमी केले जाऊ शकत नसल्याचं औद्योगिक विवाद कायद्यात नमूद केलं आहे, असं नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने (NITES) अॅमेझॉन  विरुद्ध केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार  अॅमेझॉनला 17 जानेवारी 2023 रोजी सर्व पुराव्यांसह वैयक्तिक किंवा प्रतिनिधीमार्फत कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.


कोणत्याही कंपनीत जर कर्मचारी  एका वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्याला तीन महिने अगोदर सूचना द्याव्या लागतात आणि सरकारची मंजूरीदेखील घ्यावी लागते. त्याशिवाय कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकता येत नाही. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट ही संस्था आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करते, असं नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट संस्थेचं म्हणणं आहे.


अॅमेझॉन कंपनीने वॉलंट्री सेप्रेशन पॉलिसी लागू केली आहे. ज्यासाठी कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेण्यात आली नाही.  त्यामुळे अॅमेझॉनने कामगार कायद्याचे उल्लंघन केले आहे, असं नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट संस्थेचे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी म्हटलं आहे. 


अॅमेझॉन कंपनी 18 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉन कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. याबाबतची माहिती खुद्द ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचा फटका  ॲमेझॉन कंपनीला देखील बसला आहे. कोविड 19 काळात अॅमेझॉनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. परंतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात आहे. त्यामुळेच कंपनी नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेणार आहे. 18 हजार कर्मचार्‍यांची कपातीचा अर्थ असा आहे की कंपनी 70 टक्के नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. अॅमेझॉनने ही नोकरकपात केली तर कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग असेल.


संबंधित बातमी-


Amazon Layoff : ॲमेझॉन कंपनीमधील सर्वात मोठी नोकरकपात, 10,000 कर्मचाऱ्यांना हटवणार