Pune-Mumbai Airline : पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) प्रवास आता 25 ते 30 मिनिटांत शक्य होणार आहे. पुणे आणि मुंबई बंद पडलेली विमानसेवा (Pune Airline) पुन्हा सुरु करण्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. या संदर्भात अनेक विमान कंपन्यांशी बोलण झालं आहे. त्यामुळे ही सेवा सुरु झाल्यास पुण्यातून मुंबईचा प्रवास सोपा होणार आहे.


पुण्यातून देशाबाहेर देखील विमानसेवा वाढवली आहे. परदेशात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या ठिकाणी विमानसेवा सुरु आहे. रोज किमान 30 हजार प्रवासी विमानातून प्रवास करतात. दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, कोलकता, नागपूर, अहमदाबाद, चेन्नई, गोवा या शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र काही महिन्यांपासून पुणे-मुंबई विमानसेवा बंद होती. ही सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार ही सेवा सुरु करण्यासाठी तयार करत असल्याचं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे. 


पुण्यातून मुंबईला जाण्यास साधारण चार तास लागतात. अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो. आपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे विमानसेवेची मागणी केली होती. ही मागणी पाहता त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे नागरिकांचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांचा प्रवास सोपा होणार आहे. 


विदेशी विमानसेवा सुरु


यावर्षी पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे. 2 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु झाली आहे. त्यासोबतच पुणे-बँकॉक सेवा सुरु झाली आहे. त्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विमानसेवा सुरु झाल्याने अनेक प्रवाशांना फायदा झाला आहे.


'मल्टीलेव्हल पार्किंग' प्रायोगिक तत्वावर सुरु


पुणे विमानतळावरील 'मल्टीलेव्हल पार्किंग' प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. विमानतळावरील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हे पार्किंग उभारण्यात आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणे विमानतळावर चारचाकी आणि दुचाकी यांच्या पार्किंगची मोठी समस्या नागरिकांना भेडसावत होती. ही समस्या सोडवण्यासाठी या विमानतळाच्या पार्किंगचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रवाशांना हे पार्किंग उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. मल्टीलेव्हल पार्किंग सुविधा एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण करायची होती पण कोरोनामुळे कामाला उशीर झाला. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये हे काम सुरु होणार होतं. त्यानंतरही हे काम दोन महिने लांबणीवर पडले होते मात्र आता काम पूर्ण झालं आहे. या चार मजली 'मल्टीलेव्हल पार्किंग'चा वापर विमानतळ प्रशासन व्यावसायिक तत्त्वावरही करणार आहे.