पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात होणाऱ्या रस्ते अपघातांचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. यासाठी वाहनचालकांच्या बेफिकीरीसोबतच वाहतूक व्यवस्थेतील काही त्रुटीही कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्त्वाचा निर्णय  घेतला आहे. त्यानुसार आता पुणे शहरातील (Pune City) रस्त्यांवर असणारे सिग्नल (Traffic Signal) सांभाळण्याची जबाबदारी पुणे पोलीस दलाकडे सोपवण्यात  आली आहे. 


यापूर्वी रस्त्यावरील सिग्नलची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे होती. हा संपूर्ण विषय पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित आणि अधिकारात येत असल्याने  रस्त्यावरील एखादा सिग्नल बंद पडल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी पोलिसांना महानगरपालिकेत चकरा माराव्या लागायच्या. मात्र, आता अजित पवार यांनी हे अधिकार महानगरपालिकेकडून काढून घेत पुणे पोलिसांकडे सोपवले आहेत. त्यामुळे आता सिग्नल यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीसाठी येणार सर्व निधी पुणे पोलिसांना मिळणार आहे. सध्याच्या घडीला शहरातील जवळपास 50% सिग्नल बंद अवस्थेत आहेत. आता हे सगळे सिग्नल सुरू करणे, ही पुणे पोलिसांची जबाबदारी असेल. ही जबाबदारी पुणे पोलीस पेलू शकतील का, हे आता पाहावे लागेल. 


पुण्यातील तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागण्यास बंदी


काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. पुणे पोलिसांनी या पूर्वी या तक्रारींकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र, तक्रारींचे प्रमाण वाढल्यानंतर पुणे पोलिसांनी सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होईल, असा इशारा दिला. त्यासोबतच घरगुती समारंभमध्येदेखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास तृतीयपंथीयांना प्रतिबंध घालण्यात आले आहेत. शहराला शिस्त लागण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते.


अजित पवारांनी घेतला पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा


शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात  कोणत्याही  प्रकारची अडचण होवू नये म्हणून  दक्षता बाळगावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 


विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.


श्री. पवार म्हणाले, पुणे शहरात नुकत्याच झालेल्या पुर्व मान्सून पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए  इत्यादी विभागांनी समन्वय साधून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


आपत्तीच्या ठिकाणी महानगरपालिकेने वेगाने प्रतिसाद द्यावा. शहर व परिसरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरीत काढावेत. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे रत्यावरील अतिक्रमण काढावेत. महानगरपालिकेने नाल्यांची साफसफाई त्वरीत करावी. जाहिरात फलकांचे सुरक्षा ॲडिट करावे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरित काढावेत असे सांगून नियमबाह्य जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 


पावसामुळे व वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्यास आधुनिक यंत्राचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी त्वरित मोकळा करावा.  कात्रज ते रावेत चौक पुलावर पाणी येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उपाययोजना करावी. वारजे जंक्शन जवळील सेवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक कार्यवाही करावी. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे. त्यासाठी  आवश्यकता असल्यास अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल,  असे श्री.पवार म्हणाले.


श्री. भोसले म्हणाले पुणे शहरात साडे तीन हजार कचरा वेचक कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरात पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून कार्यवाही करण्यात येत आहे. चेंबर्स स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर जाळया टाकण्यात आल्या आहेत. वॉर्ड स्तरावर देखरेखीसाठी ४६ अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक वार्डला अधिकचे १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.  नागरिकांकडून आलेल्या सूचनेनुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वार्ड निहाय अतिरिक्त निधी पुरविण्यात आला आहे. शहरातील  १ हजार ८०० अनाधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी महानगरपालिका आणि  पोलीस विभागाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात सादरीकरणानद्वारे माहिती दिली.


आणखी वाचा


पोर्शेने दोघांना चिरडणाऱ्या लाडोबाला निबंध लिहण्याची 'कठोर' शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात, 100 पानी अहवालात चुकांचा पाढा?


जनाई शिरसाई योजनेचे पाणी कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे, 450 कोटी रुपयांची मदत देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार