वाशिम : देशभरात चर्चे असलेल्या महादेव बेटिंग (Mahadev betting) ॲपप्रकरणात सेलिब्रिटींगसह बड्या हस्तींची नावे समोर आली आहेत. त्यामुळे, तपास यंत्रणांकडून बारकाईने याप्रकरणाचा तपास होत आहे. त्यातूनच महादेव बेटींग ॲप किती खोलपर्यंत पोहोचलं होतं, याचा अंदाज येईल. कारण, राज्यात नव्हे तर देश विदेशात पोहोचलेलं महादेव बेटींग ॲपचं कनेक्शन आता थेट विदर्भातील वाशिम जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आहे. 'महादेव' या अनधिकृत बेटिंग ॲपवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Police) स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली होती. आता, याप्रकरणी भाजप (BJP) ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी नारायणगाव येथील तीन मजली इमारतीत धाड टाकून 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांनी नारायणगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींनाही ताब्यात घेतले होते. तर, जवळपास 90 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात वाशिम भाजप ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी विराज ढोबळेच्या मागावर पोलीस होते, अखेर पोलिसांनी विराज ढोबळे यास अटक केली आहे. 13 जूनच्या रात्री वाशीम येथून त्याला अटक करण्यात आली. वाशिमच्या बाभूळगाव इथं राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील युवकाचं  राहणीमान आणि रुबाब सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. चारचाकी गाड्यांतून वावरणने, तसेच व्हीआयपी राहणीमान हा चर्चेचा विषय बनला होता. तर भाजप ओबीसी  युवा मोर्चा पदाधिकारी  विराज ढोबळे  पुणे इथं राहत असे. मात्र, 13 जून रोजी रात्री वाशिम शहरात दाखल होताच वाशिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याकडे एक धारदार शस्त्र सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, विराजला अटक केल्याने महादेव बेटिंग ॲप प्रकरणाशी वाशिमचे काय कनेक्शन आहे, आणि  नेमका त्याचा काय संबंध आहे याची चौकशी पोलिसांकडून होत आहे. तसेच, महादेव बेटींग ॲपप्रकरणात आणखी काही लोक वाशिम किंवा विदर्भातील आहेत का, असा प्रश्न आता चर्चेत आणि पोलिसांच्या तपासात दिसून येत आहे. 


1 हजार कोटींची गुंतवणूक, साहिल खानलाही अटक


दरम्यान, महादेव बेटिंग ॲपशी संबधित तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान आरोपी सुरेश चौकानी याने एक धक्कादायक कबुली दिली. चौकानी याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आहेत. यासाठी स्टॉक एक्स्चेंजचे ॲप वापरण्यात आले होते, अशी माहिती सुरेश चौकानी याने ईडीला दिली होती. तर, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खान यालाही छत्तीसगढमधून अटक केली होती. साहिल खान हा महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले होते.


हेही वाचा


धक्कादायक! ऑनलाइन जुगारात हरलेल्या पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गूढ उकललं