पिंपरी -चिंचवड :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. तोच धागा धरत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला इशारा दिलाय. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रश्न तूर्तास मिटलाय, पण शिवसेनेची इथं आपल्यासोबत आघाडी करायची तयारी दिसते. दोन पावलं ते मागे आले तर आपण ही तशी भूमिका घेऊ. भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपल्याला अशी मानसिकता ठेवावी लागेल. असं म्हणत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत आघाडी होईल असंच जाहीर केलं.


अजित पवार म्हणाले, शिवसेनेची  पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं. त्यामुळे ज्यावेळी आपले मित्र पक्ष समन्वयाची भूमिका घेतात, तेव्हा आपण ही दोन पावलं मागे जात पुढं जायचं असतं. तशी मानसिकता आपण ठेवायची असते. परंतु जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी राष्ट्रवादीची आणि स्वतःची  किती ताकद आहे हे बघावे.  त्या ताकदीच्या प्रमाणावर जागा वाटप झालं तर आपली काहीच हरकत नाही. एखादया ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखादया ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊ. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपची सत्ता घालवायची हेच आहे. 


महाविकासआघाडी असल्याने आता तिकीट वाटप कसं होणार अशी तुम्ही चर्चा करत असलाच. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत. आता इथं (पिंपरी चिंचवडमध्ये) कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊया, असे देखील अजित पवार या वेळी  म्हणाले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या  बातम्या :