पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नेहमीच त्यांच्या भाषणात ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करून महाराष्ट्रातील जनतेनेही बंगालमधील जनतेप्रमाणे वागून भाजपला धडा शिकवावा असे म्हणत आलेले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि शिवसेनेत चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. याच दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यूपीए आहेच कुठे? असा प्रश्न करीत काँग्रेस वगळून देशभरात आघाडी करण्याचा मनसुबा दर्शवला.


त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले. काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जींवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. शरद पवार यांनीही काँग्रेस वगळून तिसरी आघाडी होणार नाही असे स्पष्ट केले. इकडे शिवसेनेची मात्र गोची झाली. राज्यात सत्ता उपभोगायची तर काँग्रेसची साथ आवश्यक असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना भूमिका बदलावी लागली आणि ममतांना फॅसिस्ट म्हणत काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट करावं लागलं. एवढंच नव्हे तर संजय राऊत यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांची भेट घेऊन यूपीएबाबत चर्चाही केली. राहुल गांधी यांनी तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करावं असंही म्हटलं. तसंच शिवसेना यूपीएत सामिल होणार की नाही याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.


पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना मराठीवादी आणि हिंदुत्ववादी असल्याचं चित्र देशभरात आहे, तर काँग्रेस धर्मनिरपेक्ष असल्याचं चित्र आहे. असे असताना जर शिवसेना काँग्रेससोबत आली तर त्याचा फटका काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये बसू शकतो. उत्तर प्रदेश हे लोकसभेचं प्रवेशद्वार असल्यानं काँग्रेसला तेथे धोका पत्करायचा नाही. पण शिवसेना सोबत आल्यास काँग्रेसचं मोठं नुकसान होऊ शकत यात शंका नाही.




मात्र शिवसेना आणि काँग्रेस प्रथमच एकत्र येत आहेत किंवा शिवसेना काँग्रेसला प्रथमच मदत करणार आहे असे नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला मदत करून सत्तेत बसेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण काही काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सत्ता कशी आवश्यक आहे हे सांगून शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार केल्याचं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मला सांगितले होते. आज शिवसेनेला काँग्रेसची आवश्यकता असल्यानंत राज्यात काँग्रेस नेत्यांचं फावलेलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही यापूर्वी अनेकदा काँग्रेसला साथ दिलेली आहे. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कट्टर काँग्रेसविरोधी पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती. शिवसेना डाव्यांविरोधात लढत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेच्या कारवायांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर त्यांना पण ‘बळ’पण दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेला वसंत सेना असेही संबोधण्यात येत होते.


1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. सगळ्यांनी त्याला विरोध केला होता पण बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या 1977 च्या निवडणुकीतही बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा मोठा पराभव झाला. या पराभवामुळे बाळासाहेबांनी राजीनामाही देण्याची तयारी दर्शवली होती. नंतर त्यांनी निर्णय मागे घेतला ही वेगळी गोष्ट.1980 च्या लोकसभा निवडणुकीतही बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा देत निवडणुकीत एकही उमेदवार उतरवला नव्हता. एवढंच नव्हे तर प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता.


2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेऊन आभारही व्यक्त केले होते.  त्यानंतर सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आणि आता पुन्हा एकदा राज्यातील सत्ता कायम राहावी म्हणून काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरु केलाय.पण आगामी काळातील विविध राज्यातील निवडणुका पाहाता शिवसेनेची भूमिका आणि देशभरातील नागरिकांमध्ये शिवसेनेबाबत असलेले मत पाहता शिवसेनेला जवळ करून काँग्रेस स्वतःच्या पायावर धोंडा तर पाडून घेणार नाही ना असा प्रश्न मनात उद्भवल्याशिवाय राहात नाही.


चंद्रकांत शिंदे यांचे अन्य ब्लॉग :


BLOG | कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेस फोडणार?


BLOG : कन्हैयामुळे बिहारमध्ये आरजेडी काँग्रेसपासून दूर, डाव्यांचं त्रिकुट काँग्रेसला सावरणार?


BLOG | राहुल गांधी 2024 मध्ये आजी इंदिराप्रमाणे करामत दाखवू शकतील?