बारामती : आपल्या मिश्किल शैलीतील वक्तव्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच चर्चेत असतात. आज बारामतीतील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं एकच हशा पिकला. ते म्हणाले की, मला लग्नाआधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर मला डायरेक्टर केलं. त्यामुळं मला लग्नाला सोपं गेलं. पोरगा कारखान्याचा डायरेक्टर आहे, म्हणून मला पद्मसिंह पाटलांनी त्यांची बहिण दिली, असं अजित पवार म्हणाले.


ज्यांच्यात धमक आहे त्यांनी टेंडर भरा
अजित पवार म्हणाले की, अनेक जण कारखान्यावरून टीका करतात. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेने महाराष्टातील 12 कारखान्याचे टेंडर काढलं आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी टेंडर भरा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल म्हणून विकासाचा पैसा शेतकऱ्यांकडे वळवला आणि शेतकऱ्यांना मदत केली, असंही ते म्हणाले. 


सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने  मुसंडी मारली आहे. पुन्हा एकदा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेला आहे.. 21 पैकी 21 जागा मिळवत पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपलं सोमेश्वर कारखान्याचवरील वर्चस्व कायम राखलं आहे. आज याच साखर कारखान्याच्या 60 व्या हंगामातील मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. 
 
जो कामच करत नाही तो चुकायचा प्रश्नच येत नाही


अजित पवार म्हणाले की, जो काम करतो तो चुकतो. जो कामच करत नाही तो चुकायचा प्रश्नच येत नाही. आम्ही चुकलो असु तर दुरुस्त करू, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, 2 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला कृषी महाविद्यालयात येणार आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. 


राज्यातील मालमत्ता करावर लागणारा दंड 24 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणणार : अजित पवार यांची घोषणा 
राज्यातील मालमत्ताकरांच्या थकबाकीदारांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. मालमत्ता कर थकल्यास राज्यातील महानगरपालिका वर्षाला तब्बल 24 टक्के इतके प्रचंड व्याज सामान्य नागरिकांकडून आकारत आहे. काल ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगण्यात आली. यासंदर्भात पवार यांनी तात्काळ आपल्या सचिवांशी बोलणे करून व्याज दर 24 टक्क्यांऐवजी 12 टक्के व्याज करण्यासाठी कॅबिनेट नोट सादर करण्यास सांगितलं. या प्रस्तावावर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते बसून योग्य निर्णय घेऊन तसे निर्देश सर्व महापालिकांना दिले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.