Pune News : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, तोच तो रटाळपणा आपल्या नजरेसमोर येतो. पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मात्र याला अपवाद आहे. कारण इथं इंग्रजी माध्यमांच्या तोडीसतोड शिक्षण देण्याची किमया नागनाथ विभूते हे क्रियाशील शिक्षक साधतात. विभूते पाचवी ते सातवीच्या विध्यार्थ्यांचा भविष्याचा पाया आत्ताच भक्कम करतायेत. 


इंजिनियरिंगचे कॉलेजमध्ये दिलं जाणारं रोबोटीकचं शिक्षण चक्क पुण्याच्या खेड मधील जिल्हा परिषद शाळेत दिलं जात आहे. जांभुळदरा शाळेचे क्रियाशील शिक्षक नागनाथ विभूते या विध्यार्थ्यांना नेहमीच असं तंत्रज्ञानाशी जोडून ठेवतात. त्यांचा हा खटाटोप पाचवी ते सातवीच्या विध्यार्थ्यांचा इंजिनियरिंगचा पाया आत्ताच भक्कम करतोय. विभूते केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहत नाहीत. म्हणूनच ते विध्यार्थ्यांना कृतीतून ज्ञान देण्यासाठी कार्यशील असतात. त्याचाच एक भाग म्हणजे हे रोबोटीक शिक्षण होय. टरटल रोबोट (कासव रोबोट ), क्लँप रोबोट (टाळी वाजवल्यावर थांबते व पळतो), क्रोक रोबोट (चालणारी मगर) आणि ट्राय सायकल (तीन चाकी सायकल) रोबोट याची निर्मिती ते प्रत्यक्षात करून दाखवितात. विभूतेंना स्वतःलाच तंत्रज्ञानाची खूप आवड आहे, ती आवड जोपासत असताना ते विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर ही घालतात. यासाठी अनेकदा स्वखर्चातून उपकरण उपलब्ध करतात. लॉकडाऊनच्या काळात ही विभूतेंनी विध्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षणाचे ऑनलाइन धडे दिले. अन प्रत्यक्षात विध्यार्थी शाळेत येताच त्यांनी प्रात्यक्षिकाची त्याला जोड दिली. विभूते म्हणतात मला स्वतःला तंत्रज्ञानाशी जुळून रहायला आवडतं, तेच ज्ञान मी माझ्या विध्यार्थ्यांना देण्यात कसूर बाळगत नाही. त्यांच्या बुद्धीला नेहमीच चालना दिली की आपोआप इतर विषयांत याचा निश्चित फायदा होतो. शिवाय या विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंग क्षेत्र निवडलं तर त्यांचा पाया आजचं भक्कम होतोय. या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल झालं तर मला नक्कीच अभिमान वाटेल. 




विद्यार्थी देखील विभूते सरांच्या मार्गदर्शनाला साथ देतात. म्हणूनच आज हे विध्यार्थी स्वतः रोबोट साकारतात. सातवीत शिक्षण घेणारा राज भोसले सांगतो की सरांनी रोबोटिक शिक्षणाचं काही ज्ञान ऑनलाइन दिलं होतं. पण त्यात थोडा व्यत्यय आला होता. आता मात्र थेट प्रात्यक्षिक पहायला आणि करायला मिळतंय, हे अनुभवताना आम्हाला खूप आनंद मिळतोय. वैष्णवी कडला सातवीच शिक्षण घेताना इंजिनियरिंगचे ज्ञान मिळत असल्याने ती खूप उत्साहीपणे यात सहभागी होते. इंग्रजी माध्यमात प्रवेश घेता न आल्याचं तिचं दुख्ख विभूते सरांमुळं दूर झालंय. आजवर पुस्तकात चित्र आणि टिव्हीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले हे रोबोट तिला स्वतःला साकारायला मिळतायेत. विभूते सरांमुळं हे शक्य झाल्याचं ती सांगते.


नागनाथ विभूतेंसारख्या क्रियाशील शिक्षकांमुळं जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. हा सकारात्मक बदल घडत असल्याने शाळेचे मुख्याध्यापक विभुतेंच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असतात. ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे, त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांत प्रवेश घेणं शक्य होत नाही. जरी शक्य असलं तरी अनेकांना आज ही मराठी माध्यमांच्या शाळेवर विश्वास आहे, ते जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतात. पण अशा या विध्यार्थ्यांना आमचे विभूते हे क्रियाशील शिक्षक असं तंत्रज्ञान देतात. हे नक्कीच अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. म्हणूनच आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देतो असं शाळेचे मुख्याध्यापक भास्कर गाडगे म्हणाले.


वीस वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा नव्हत्या. तेंव्हा अशाच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी घडायचे. ते विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर देखील आहेत. पण आता काळ बदललाय. इंग्रजी माध्यमांचं लोन अगदी ग्रामीण भागात येऊन पोहचलंय. अशावेळी जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकवायचं असेल. तर असं तंत्रज्ञानाचे बाळकडू देण्याची इच्छाशक्ती प्रत्येक शिक्षकांनी दाखवायला हवी.