पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना 'पुन्हा एकदा एक पुस्तक' लिहायचा सल्ला देणार  असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा असं विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही दुसरं पुस्तक लिहा, त्याचं नाव द्या 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असं म्हटलं आहे. 


राजकारणात आधी ओलावा होता जवळीक होती 


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्या राज्याला राजकारणाचा सुसंकृतपणा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, विचार कसे मांडले पाहिजेत, समाज प्रबोधनाची ताकद कशी असते, हे सगळं आपण यशवंतराव चव्हाण साहेबांकडून शिकलो. मी अनेकदा सांगतो. या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा जर आपण टिकवलं पाहिजे. तो पुढं नेला पाहिजे. तो टिकवला पाहिजे अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, शिकवण आहे. राजकारणात आधी ओलावा होता. जवळीक होती एकमेकांच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम होतं. जिव्हाळा होता ते अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. 


माझी जबाबदारी वाढल्यामुळे आता पीडीसीसी बँकेकडे लक्ष देता येत नाही म्हणून मी संचालक पदाचा राजीनामा दिला. पीडीसीसी बँकेला जागा कमी पडत होती परवा 58 कोटी रुपये देऊन समोरची पारशी माणसाची एक जागा विकत घेतली आहे. आता बँकेचे बांधकाम सुरू करू. पीडीसीसी बँकेचं काम चांगलं सुरू आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. 


भाषणाचा कुठलाही आणि कसलाही अनुभव नव्हता


1991 साली पहिल्यांदा मी निवडणूक लढवली. त्यावेळेस भाषण करायला भीती वाटायची, भाषणाचा कुठलाही आणि कसलाही अनुभव नव्हता. फॉर्म भरला आणि दगडूशेठ गणपतीला नारळ फोडून भाषण करायची वेळ आली. मला काहीच बोलता येत नव्हतं. प्रतिभा काकी कुठेतरी लांब थांबून ऐकत होती. मग म्हटलं की जे व्हायचं ते होईल मग भाषणाला उठलो. पवार साहेब एवढं बोलतात तर आपल्यालाही जमेल आणि आता सगळे बघतायेत की मला काय जमलं, अशी आठवण देखील अजित पवारांनी यावेळी सांगितली. 


1 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही मोठी रॅली काढली आहे, मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला आम्ही जमणार आहोत, सहा भागातून पाणी आणि माती कार्यकर्त्यांना आणायला सांगितली आहे, त्यादिवशी मुंबईत सभा घेणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी सांगितली आहे.