Agriculture News : कॅन बायोसिस या कंपनीला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) च्यावतीने प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय सस्टेनेबल ॲग्रीकल्चर पुरस्काराने (Agriculture News) गौरविण्यात आले. भाताची पराली जाळण्याऐवजी आहे त्या शेतातच मातीत पूर्णत: एकजीव करणारे तंत्रज्ञान कॅन बायोसिसने शोधले आहे. त्यासाठी कॅन बायोसिस कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. फिक्की हाऊस, नवी दिल्ली येथे आयोजित तिसर्या शाश्वत कृषी शिखर परिषदेत पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिक्की ही व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी आणि जुनी संस्था आहे.
शाश्वत शेतीला चालना देणारे संशोधन केल्याबद्दल कॅन बायोसिसची देश पातळीवर निवड करण्यात आली. कॅन बायोसिसच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच कॅन बायोसिसच्या तंत्रज्ञान प्रमुख डॉ. मेधा कुलकर्णी, विपणन आणि मानव संसाधन विभागाचे सह-उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार, विक्री सह-उपाध्यक्ष राहुल पारखी उपस्थित होते.
काय आहे संशोधन?
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दरवर्षी हिवाळ्यात वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो. यामागे हरियाणा-पंजाबातील पराली (तांदळाचे काड) जाळली जाणे हे मुख्य कारण असते. ही पराली जाळण्याऐवजी आहे त्या शेतातच मातीत पूर्णत: एकजीव करणारे तंत्रज्ञान कॅन बायोसिसने शोधले. लुधियाना येथील पंजाब कृषी विश्वविद्यालय आणि हिस्सार येथील हरियाणा कृषी विश्वविद्यालय यांनी दोन वर्षे चाचण्या घेऊन हे संशोधन प्रमाणित केले. त्यानंतर हरियाणा-पंजाबातील दहा जिल्ह्यांमधले हजारो शेतकरी या संशोधनाचा यशस्वी वापर करत आहेत.
वायु प्रदुषण टाळण्यासाठी उत्तम पर्याय
हार्वेस्टरने भाताची सुगी झाल्यानंतर भाताचे काड शेतात शिल्लक राहते. ते काढून टाकणे खूप खर्चिक असल्याने ते पेटवून देणे एवढाच उपाय शेतकऱ्यांकडे असतो. मात्र त्यामुळे जमिनीतील कार्बन जळून जातो आणि जैविक सृष्टीचा नाश होतो. परिणामी मातीची सुपिकता नष्ट होते. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. जमीन कडक झाल्याने रासायनिक खतांची उपयुक्तता खालावते. साहजिकच पिकांचा उत्पादन खर्च वाढूनही उत्पादकता वाढत नाही. शिवाय पराली जाळल्यामुळे प्रचंड वायू प्रदूषण होते.
आठ वर्षांच्या अथक परिश्रमाला यश
हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी कॅन बायोसिसने अथक आठ वर्षे संशोधन करून शाश्वत उपाय शोधला. एकरी चार किलो स्पीड कंपोस्ट हे उत्पादन युरियासोबत वापरल्यास भाताचे एकरी सुमारे अडीच टन काड मातीत पूर्णत: एकजीव होते. 'स्पीड कंपोस्ट'मधील बावीसहून अधिक प्रकारचे जिवाणू भात काडाचे विघटन करतात. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसानंतर हरियाणा-पंजाबातील शेतकऱ्यांना भातानंतरचे दुसरे गव्हाचे पीक घेण्यासाठी शेत उपलब्ध होते.
पराली जाळल्याने रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या भातातील नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) प्रचंड प्रमाणात वाया जाते. पंजाब, हरियाणात भात पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण रासायनिक खतांपैकी 65 टक्के 'एनपीके'चा ऱ्हास पराली जाळल्याने होत असल्याचे आढळून आले. असेच नुकसान गहू, ऊस, कापूस आदी पिकांचे अवशेष जाळल्याने होत असते. 'स्पीड कंपोस्ट'मधील 22 पेक्षा अधिक जिवाणूंच्या प्रभावी वापरामुळे हे नुकसान टाळण्यात पंजाब-हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे.
संंशोधनाची फिक्कीकडून दखल
कॅन बायोसिसच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालक संदीपा कानिटकर यांनी सांगितले, "भारतातील सर्वोत्तम मायक्रोबियल उत्पादन करत असताना आम्ही नेहमीच संशोधन आणि शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. 'फिक्की'ने याची दखल घेत राष्ट्रीय सन्मान केला याचा आनंद आहे. केंद्रीय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाने या संशोधनासाठी सहकार्य केले. भाताबरोबरच गहू, ऊस, कापूस पिकांमध्ये हे संशोधन पोहोचवण्यासाठी आम्ही विविध राज्य सरकारे, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत आहोत." केंद्र सरकारने नुकतेच कार्बन क्रेडिट संदर्भातील राष्ट्रीय धोरण आणले आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ कसा मिळवून देता येईल यावर कंपनीने भर दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
30 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठिशी
कॅन बायोसिस ही भारतातील अग्रगण्य बायो फर्टीलायझर कंपनी तीन दशकांपासून अधिक काळ शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. कंपनीला गुणवत्तेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके मिळाली असून कॅन बायोसिसचे 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी 7 राज्य आणि 8 देशांत काम करत आहेत. फ्रान्समधील डी सँगोज कंपनीने नुकताच कॅन बायोसिससोबत धोरणात्मक करार केला आहे.
इतर महत्वाची बातमी-