पुणे :  आरोग्य भरती घोटाळ्याप्रकरणी आता पुणे पोलिसांच्या तापासाला वेग आला आहे . काल पुणे सायबर सेलने विजय मुरडेला अटक केल्यानंतर आज अनिल गायकवाडला अटक केली आहे . हे दोघेही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील असून त्यांनी पैसे कमावण्यासाठी  आरोग्य भरतीचा पेपर पसरवण्याचे काम औरंगाबादमधून केल्याचे दिसून आलंय. पेपरफुटीचा हा प्रकार एबीपी माझाने उघड केल्यानंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होऊ लागले आहेत . 


अनिल गायकवाड हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव वाडी या गावात एमएचसीईटीचे प्रशिक्षण देणारी संस्था चालवतो. पण या संस्थेच्या आडून तो वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर लीक करण्याचं काम करत होता. यामध्ये त्याला साथ होती अंबड तालुक्यतील नांदी गावातील विजय मुरडेची. दोघेही औरंगाबादला  येऊन  नोकरभरतीचे रॅकेट चालवत होते आणि त्यातूनच 31 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता  झालेल्या आरोग्य भरतीचा पेपर त्यांना त्यादिवशी सकाळी आठ वाजून 36 मिनिटांनी मिळाला.  अगोदर हा पेपर अनिल गायकवाडच्या टेलिग्राम अकाउंटला आला. त्याने तो डाऊनलोड करून  विजय मुरडेला व्हॉट्सअॅपला पाठवला आणि विजय मुराडेने तो पुढे व्हॉट्सअपवर इतरांना पाठवल्याच  पोलिसांचं म्हणणं आहे . पण गायकवाड काय किंवा मुरादे या प्रकरणातील छोटे मासे आहेत. कारण आरोग्य भरतीचा हा पेपर नक्की कोणी आणि कुठून फोडला याचा उलगडा होण्याची गरज आहे.


 पोलिसांनी आता अनिल गायकवाड आणि विजय मुराडेंच्या  त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. पण आरोग्य विभागाच्या हा  पेपर फुटल्यानंतर तो अनेक ठिकाणी पोहचल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी केलेल्या विद्यार्थ्यांकडून न्यायालयात याचिका दाखल करून करण्यात आली आहे.   


 खरं तर मिलिट्री इंटेलिजन्सने आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचे पुरावे 9 नोव्हेंबरलाच पिंपरी - चिंचवड पोलीसांकडे दिले होते. मात्र पिंपरी - चिंचवड पोलिस पेपर फुटलाच नव्हता असा दावा करू लागल्यानं अखेर या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या  खंडपीठात याचिका केली. न्यायालयात हे प्रकरण पोहचल्याच दिसताच आरोग्य आणि पोलीस खातं जागं झालं आणि पुणे सायबर सेलला गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागलेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेक जणांना अटक होण्याची शक्यता आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल 


देशातील विविध परीक्षांचे पेपर फोडून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


Health Department : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवर पुण्यात गुन्हा नोंद, सायबर क्राईमकडून तपास सुरु