Pune Metro News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. पुणे मेट्रो-3 साठी व्हायबिलिटी गॅप फंडिंगची अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले आहेत. तसेच केंद्राकडून मिळालेल्या मंजुरीमुळे पुणे मेट्रो-3चे प्रत्यक्ष काम सुरु होईल आणि येत्या 3.5 वर्षांत ते पूर्ण होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "पुणे मेट्रो-3 साठी व्हायबिलिटी गॅप फंडिंगची अंतिम मान्यता प्रदान केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे खूप खूप आभार! यामुळे पुणे मेट्रो-3चे प्रत्यक्ष काम सुरू होईल आणि येत्या 3.5 वर्षांत ते पूर्ण होईल." ट्वीटमध्ये पुढे ते म्हणाले की, "पुणे मेट्रो-3चे नियोजन, मंजुरी ही संपूर्ण प्रक्रिया आमच्या काळात झाली. मा. नरेंद्र मोदीजी यांनी कायमच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना भरीव सहकार्य केले. पीपीपी धर्तीवर हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या 23 कि.मीच्या या उन्नत मार्गाची प्रकल्प किंमत 7420 कोटी रूपये आहे. आणि या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय, तर नवीन धोरण लागू झाल्यानंतर महाराष्ट्राने पुढाकार घेत पीपीपी धर्तीवर तयार केलेला हा देशातील पहिला प्रकल्प आहे."
देवेंद्र फडणवीसांनी या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात केलेल्या भाषणाच्या व्हिडीओची लिंकही ट्वीट केली आहे.
पुणे मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. 24 डिसेंबर 2016 पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. 24 तारखेला नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातच पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. मुंबईमध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली आणि वांद्रे-विरार उन्नत रेल्वे मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं.
पुणे मेट्रोच्या उभारणीतील मार्ग मोकळा
पुणे मेट्रो लाईन 1, 2 आणि 3 चा मार्ग आता मोकळा झाला आहे. कॉरिडोर 1 मधील हे मार्ग काही ठिकाणी भूमिगत तर काही ठिकाणी उन्नत मार्गिकांद्वारे उभारण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या 17.4 किमी. च्या मार्गात एकूण 14 स्थानकं आहेत. कॉरिडोर 2 वनाझ ते रामवाडी या 15.7 किमीच्या मार्गात 16 स्थानकं आहेत. तर कॉरिडोर 3 हिंजवडी ते सविल कोर्ट या 23 किमी. च्या मार्गात 22 स्थानकं आहेत.
या लाईनवरील काही मेट्रो स्टेशनच्या उभारणीत अडथळा ठरणाऱ्या वस्त्यांवर कारवाईस प्राधिकरणाला हायकोर्टाकडनं मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बेकादेशीर तसेच प्रकल्पात बाधा येणा-या बांधकामांना हायकोर्टानं दिलेला दिलासा या महिन्याअखेरपर्यंतच कायम राहणार आहे. यात पुण्यातील कामगार पुतळा वसाहत (160 मी.), राजीव गांधी नगर (90 मी.) , तसेच जुना तोफखाना, शिवाजी नगर, विमान नगर परिसरातही होणार कारवाई होणार आहे. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला माहिती दिली की, कुठल्या वस्तीत किती पात्र आणि किती अपात्र रहिवासी आहेत. यातील सर्व पात्र रहिवाश्यांना हडपसर इथं त्यांच्या पात्रतेनुसार जागा देण्यात आली आहे. त्यावर पात्र रहिवाश्यांनी त्यांना देण्यात आलेल्या निवाऱ्यात लवकरात लवकर स्थलांतरीत व्हावं, असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या स्थानिकांना या निर्देशांची सविस्तर माहिती वृत्तपत्रांद्वारे देण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आली आहे.