Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर (Pune Chandani Chowk) येथील रस्त्याच्याकडेचे खडक फोडण्यासाठी मंगळवारी (4 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा ते दीड असा दोन तासांचा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे पुणे - बेंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मुंबई ते सातारा या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी हा ब्लॉक असणार आहे.


खडक फोडण्यासाठी 16 ठिकाणी होल्स पाडत स्फोट करण्यात येणार आहेत. हे स्फोट होताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच एका बाजूची लेन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई-सातारा या लेनवरील वाहतूक रात्री दीड वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळवण्यात येणार आहे.


काल देखील एका बाजूची टेकडी फोडण्यासाठी भर दुपारी ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र पूर्वसूचना न देता हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांना या ब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागला होता. यात काही शाळेच्या बस देखील अडकल्या होत्या. दीड ते दोन तास बस जागेवर उभी असल्याने विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही झाला. शालेय बस असल्याने मुलांनी रडारड केली होती. 


मुलं वेळेत घरी न आल्याने पालकांची दमछाक
या ब्लॉकमध्ये शालेय मुलांची बस अडकली होती. त्यामुळे दीड ते दोन तास मुलं या ब्लॉकमध्येच होती. मुलांची शाळेतून घरी येण्याची वेळ चुकल्याने अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पालकांनी अनेकांकडून फोनवरुन माहिती घेतली त्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला. मात्र काहीही न सांगता अशाप्रकारचा ब्लॉक घेतल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आज हा ब्लॉक दिवसा न घेता रात्री घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पूल पाडण्यासाठी 1300 होल्स अन् टेकडीसाठी 16 होल्स 
पूल पाडण्यासाठी 1300 होल्स पाडण्यात आले होते आणि 600 स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र या टेकड्या पाडण्यासाठी 16 होल्सपाडून त्यात स्फोटकं भरण्यात येणार आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर काऊंटडाऊन देत या टेकडी पाडण्यात येणार आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी या टेकड्या पाडल्या जात आहे. स्फोट झाल्यानंतर राडारोडा उचलण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सुरळीत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.