पुणे : जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि लेकरांचं. आपल्या जिवापलीकडे लेकरांची काळजी घेणारी असते ती आई. म्हणूनच आईचं प्रेम हे अभाळमाया आणि सागराएवढं विस्तीर्ण असतं. मात्र, माय-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात (PUne) उघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना असून स्थानिक व पोलिसांच्या (police) मदतीने या बालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटेननंतर स्थानिकानी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या. 


या नवजात शिशुचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्या बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. मात्र, इवल्याश्या बाळाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलीस घेत आहेत.


दरम्यान, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तर परिसरातील रुग्णालयात नुकतेच जन्मलेल्या रुग्णालयातील बालकांची माहिती घेऊनही पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. मात्र, आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं समाजमन देखील हादरुन घेलं आहे. 


हेही वाचा


मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं