पुणे: विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि त्यानंतर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांचा मृतदेह पुणे शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिंदवणे घाटात सापडला. सतीश वाघ यांचे अपहरण काल (सोमवारी) सकाळी शेवाळवाडी येथून करण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरू केला असला तरी, अद्याप कोणतेही ठोस पुरावे किंवा आरोपींविषयी माहिती समोर आलेली नाही. या अपहरण आणि हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून आठ पथकं रवाना झाली आहेत. तर घटनेनंतर आज आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Satish Wagh Case Update)


काय म्हणाले योगेश टिळेकर?


माध्यमांशी बोलताना टिळेकर म्हणाले, 'काल आमच्या मामाचं या जागेवरून अपहरण झालं. काल दुपारनंतर पोलिसांनी तपास यत्रंणा राबवली. मामाचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, ही दुर्दैवी घटना आमच्या परिवारामध्ये घडली आहे. पोलिस यत्रंणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे. काल सकाळीपासून, रात्री आणि आज देखील पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. पोलिस नक्कीच या घटनेचा लवकरात लवकर तपास करतील आणि सुगावा लावतील. खुनाचं कारण काय आहे, आणि ही घटना का घडली हे शोधतील. मी, माझी आई आणि आमचा सर्व परिवार मोठ्या धक्क्यात आहे. पोलिस चांगलं सहकार्य करत आहेत. सर्व यत्रंणा कामाला लागली आहे. आम्हाला आशा आहे गुन्हेगारांना लवकरच अटक होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल या घटनेत राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे. सामान्य नागरिक याच्यावर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करेल करते.मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी फोन केले आहेत, माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत.', असं योगेश टिळेकरांनी म्हटलं आहे. (Satish Wagh Case Update)


सतीश वाघ यांचं काल सकाळी चालण्यासाठी गेल्यानंतर अपहरण झालं होतं. ते सोलापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी चारचाकी गाडी घेऊन 4 अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्ती गाडीत बसवलं. सतीश वाघ यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस घटनेचा कसून तपास करत आहेत. काल सकाळी सतीश वाघ यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता, मात्र सतीश वाघ आणि त्यांच्या अपहरणकर्त्यांचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही. मात्र, सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात आढळला. पोलिसांची तपासाची कार्यवाही सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(Satish Wagh Case Update)