पुणे: अनेकदा लोक कामाच्या, जॉबच्या आहारी जाताना दिसतात, कामामुळे तणावाखाली येणं, झोप, वेळेवर जेवण, काळजी न घेणं असे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं. मात्र, कामामुळे तणावात येऊन, झोप, जेवण न करता रात्र-रात्र काम करून पुण्यात एका तरूणीचा मृत्यू झाला असल्याचा दावा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. 


पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणीचा २६ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबियांनी ती काम करत असलेल्या कंपनीवर गंभीर आरोप करत कामामुळे तिच्यावर विपरीत परिणाम झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तरुणीवर कामाचा ताण असल्यामुळं तिचा मृत्यू झाला असा दावा कुटुंबियांनी केला आहे. यासंदर्भात तरुणीच्या आईने कंपनीच्या प्रमुखाला पत्रही लिहिलं आहे. त्याचबरोबर या तरूणीच्या अंत्यसंस्काराला तिच्या कंपनीतील किंवा ऑफिस मधील कुणी नव्हतं असं तरुणीच्या आईने म्हटलं आहे. तरुणीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


काय आहे नेमकं प्रकरण?



बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्याच्या शाखेत एना सेबेस्टियन पिरेयिल नावाची तरूणी काम करत होती. तिचा मृत्यू झाला आहे. एना ही केरळची होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिल आहे. आपल्या लेकीने कंपनी जॉइन केल्यापासून ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च २०२४ मध्ये कंपनी जॉइन केली होती. तिचा मृत्यू 20 जुलै रोजी झाला होता.


पत्रात काय लिहलं आहे? 


पहिलीच नोकरी असल्यामुळे एना खुप मेहनतीने आणि झोकून देऊन काम करायची. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप काळ वेळ न पाहता काम करायची. मात्र, याचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर झाला. कंपनीत जॉइन झाल्यानंतर काही दिवसातच तिला अस्वस्थपणा जाणवू लागला, झोप न येणं, तणावासारख्या समस्या तिला सुरू झाल्या. तरीही ती काम करत होती. तिला वाटायचं की खूप कष्ट, सतत काम करत राहणं हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. एनाच्या आईने असाही दावा केला की, कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. तिचा मॅनेजर क्रिकेट सामन्यावेळी अनेकदा मिटिंगच्या वेळा बदलायचा आणि दिवस संपताना काम द्यायचा. यामुळे ताण वाढायचा, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 


रात्री एक काम सोपवलं जे सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं



या पत्रात एनाच्या आईने एका घटनेचाही उल्लेख केला आहे. एनाच्या बॉसने एका रात्री एक काम सोपवलं जे सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. तिला असिस्टंट मॅनेजरने रात्री कॉल केला आणि काम दिलं. ते काम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. त्यामुळे तिला विश्रांतीसाठी थोडाही वेळ मिळाला नाही. जेव्हा तिने मॅनेजरला अडचण सांगितली, तेव्हा तिला उत्तर मिळालं की, तू रात्री काम करू शकतेस, आम्हीही हेच करतो.


एना खूप थकून घरी यायची अन्...



एना कामावरून प्रंचड थकून घरी यायची. अनेकदा ती न जेवता, कपडे न बदलताच झोपून जायची. तिच्याकडे रिपोर्टसाठी मेसेजेस यायचे. डेडलाइन पूर्ण करण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत होती. ती लढणारी होती ती सहज हार मानायची नाही. आम्ही तिला नोकरी सोडायला सांगितलं पण तिला शिकायचं होतं, नवा अनुभव घ्यायचा होता. पण दबाव तिच्यासाठी खूपच जास्त ठरला असंही एनाच्या आईने पत्रात लिहलं आहे. 


एनाच्या मृत्यूच्या काही आठवडे आधी तिच्या छातीत दुखत असल्याचं सांगितलं जात आहे. तिला पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिचा ईसीजी नॉर्मल होता. कार्डियोलॉजिस्टनी ती पुरेशी झोप घेत नसल्याचं आणि उशिराने जेवत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, एनाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे.