पुणे : पॅरोल किंवा फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर न सोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील 100  कैद्यांनी सकाळपासून उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. कैद्यांना पॅरोल, फर्लो न देण्याचा निर्णय राज्य सरकारने 31 ऑगस्ट 2016 रोजी घेतला होता. या निर्णयाला विरोध करत कैद्यांनी उपोषण सुरु केलं आहे.


 

कैद्यांच्या उपोषणावर येरवाडा जेल प्रशासन काय म्हणाले?

 

तुरुंग प्रशासनाच्या मते, सर्व कैद्यांना संध्याकाळचे जेवण सोपवले आहे. काहींनी खाल्ले आहे, तर काहींनी खाल्लंनाही. सरकारने केलेला नवा नियम मागे घ्यावा, यासाठी कैद्यांकडून आधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कुठेही उपोषणाचा उल्लेख नव्हता. मात्र, काही कैद्यांनी उपोषण करत असल्याची तोंडी घोषणा केली, असा तुरुंग प्रशासनाचा दावा आहे.

 

पॅरोल, फर्लोबाबत नवा नियम काय आहे?

 

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पल्लवी पूरकायस्थ दोषी पळून गेल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. फक्त बलात्कारातील दोषीच नाही तर दरोडेखोर, ड्रग कायद्याखालील दोषी, खून आणि आजन्म जन्मठेप शिक्षा सुनवलेल्या दोषींनाही पॅरोल किंवा फर्लो मिळणार नाही.

 

पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणात काय झालं?

 

अ‍ॅडव्होकेट पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र शिक्षा भोगत असलेला सज्जाद मुघल पॅरोलवर बाहेर आला आणि त्यानंतर फरार झाला.

 

नाशिक जेलमधूनही पॅरोलवर असणाऱ्या कैद्याचंं पलायन

 

नाशिक जेलमधून अनेक दोषींनी पॅरोलवर असताना पलायान केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत 21 दोषींनी पॅरोलवर असताना पलायन केलं आहे. त्यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषीबाबत अशी घटना होऊ नये, यासाठी त्यांना पॅरोल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.