नवी दिल्ली: कृषी उतन्न बजार समिती APMC नुसार, सध्या तूर डाळीची किंमत 220 रुपये प्रति किलो आहे. येणाऱ्या काळात त्याच्या किंमतीत वाढ होऊन ती 300 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. हे दर नवीन स्टॉक बाजारात येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. यात तूर डाळ ही 220 रुपये प्रतिकीलो, हरबरा डाळ 140-160 रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ 180 रुपये, मूग डाळ 100 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सध्या हे दर मागणी आणि पुरवठा यावर आधारित आहेत. धुळ्यातील एका व्यापाऱ्याने दिलेल्य माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे.
तर APMC चे संचालक नानासाहेब पाटील यांच्या मते, डाळींच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची कमी होण्याची शक्यता नाही. येत्या दोन महिन्यात केवळ मूगाच्या डाळीच्या दरातच कपात होण्याची शक्यता आहे. मूग डाळीची बाजार समितीत आवक ऑगस्ट महिन्यानंतर सुरु होते, तर दुसऱ्या डाळींची आवक इतर महिन्यात होते. मूग डाळीची लागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये होते, तर हरबऱ्याच्या डाळीची लागवड फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. त्यामुळे येणाऱ्या काळात डाळींच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पाटील म्हणाले की, ''आगामी गणेशोत्सवाच्या काळात डाळीच्या किंमतीत मोठी वाढ होऊन ती 300 रुपये प्रतिकिलो मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने डाळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे दर येणाऱ्या काळतही आणखी वाढण्याची शक्यता आहे.''
पाटील पुढे म्हणाले की, ''सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 71 लाख हेक्टर शेतजमीनीवर डाळींचे उत्पादन होते. 15 जुलैपर्यंत 51 लाख हेक्टर शेतजमीनीवर डाळीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डाळीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल. या वर्षी तूर डाळीचेच उत्पादन 1 कोटी 28 लाख टन आहे. गेल्यावर्षी हेच उत्पादन 3.17 कोटी टन झाले होते. तर चालू वर्षी डाळींचे एकूण उत्पादन 2 कोटी 70 लाख टन होण्याची आशा आहे. गेल्या वर्षी डाळीचे उत्पादन 3 कोटी 35 लाख टन झाले होते.
या वर्षी भारतातील डाळीच्या कमी उत्पादनामुळे येणाऱ्या काळात डाळीची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणार आहे. भारताला ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, दक्षिण आफ्रिका, म्यांनमार आदी देशांतून डाळींची आयात करावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारदेखील डाळींचे उत्पादन वाढण्यासाठी डाळ उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.