नवी दिल्लीः डाळीचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. डाळ जवळपास 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अतिरिक्त साठ्याची क्षमता 5 टक्क्यांनी वाढवून 8 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामळे डाळ 120 रुपये प्रति किलोने देणं शक्य होणार आहे.
केंद्राच्या या निर्णयाला मात्र राज्यांनी गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कारण या निर्णयानंतर राज्यांचा कसलाही प्रतिसाद आला नसल्याचं दिसून आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
डाळीची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी
डाळ साठवणूकीची मर्यादा आतापर्यंत 1.5 टन एवढी होती. किरकोळ विक्री करण्यासाठी ही डाळ राज्यांना देण्यात येत होती. ग्राहक मंत्रालयाच्या आकड्यांनुसार सध्या उडीद डाळ 196, तुर डाळ 166, मूग डाळ 120, मसूर डाळ 105 आणि हरभरा डाळ 105 रुपये प्रति किलो आहे.
केंद्राच्या नवीन साठवणुकीच्या नियमानुसार डाळ थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. ही डाळ राज्यांना पुरवण्यात येणार असून ग्राहकांना 120 रुपये प्रति किलोच्या भावाने विक्री करण्यात येणार आहे.
मात्र राज्यांनी केंद्राच्या या निर्णयाला गांभीर्याने न घेतल्यामुळे सध्या तरी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे मात्र निश्चित आहे.