मुंबई : एकेकाळी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत दबदबा असलेल्या काँग्रेसचा प्रभाव आता कमी झाला आहे, काँग्रेसची अवस्था त्या जमीनदारांप्रमाणे झालीय ज्यांना आपली हवेलीही सांभाळता येत नाही असं विश्लेषण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. काँग्रेसने ही वस्तुस्थिती स्वीकारली तरच इतर विरोधी पक्षांसोबत त्यांचे संबंध चांगले राहतील असंही शरद पवारांनी सांगितलं.
इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवारानी हे मत व्यक्त केलं. आपल्या नेतृत्वाबाबत वेगळा विचार करण्यास काँग्रेसची तयारी नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं. ज्यावेळी 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांचा चेहरा करण्याची चर्चा सुरु असते तेव्हा काँग्रेसवाले म्हणतात की आमच्याकडे राहुल गांधी आहेत, असाही टोला पवारांनी काँग्रेसला लगावला.
शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
माध्यमांनी शरद पवारांना काँग्रेसच्या या भूमिकेमागचे कारण काय आहे असा सवाल केल्यानंतर त्यांनी जमीनदारांचा एक किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले की, "मी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचा एक किस्सा ऐकला आहे, ज्यांच्याकडे मोठ-मोठ्या हवेल्या होत्या. जमीन सुधारणा कायद्यानंतर त्यांच्या जमिनी कमी झाल्या पण हवेल्या तितक्याच मोठ्या राहिल्या. त्यांच्या शेतीतून येणारे उत्पन्न घटलं. मग त्यांना आपल्या हवेलीच्या देखभालीचा खर्चही परवडेनासा झाला."
शरद पवारांनी आपल्या या वक्तव्यातून काँग्रेसला जोरदार टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचीही चर्चा आहे. आता शरद पवारांच्या या विश्लेषणावर काँग्रेसचे काय प्रत्युत्तर असेल याची उत्सुकता सर्वानाच आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Updates : कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; गेल्या 24 तासात 35 हजार रुग्णांची भर, 260 जणांचा मृत्यू
- Rashid Khan : राशिद खानचा अफगाणिस्तान क्रिक्रेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा; संघ निवडीमध्ये स्थान न दिल्याने निर्णय
- 'जेठालाल'ची क्रश 'बबिता जी' 9 वर्षाने लहान 'टप्पू'च्या प्रेमात! मुनमुन दत्ता आणि राज अनादकत रिलेशनशिपमध्ये!