पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या बारामतीचा (Baramati) मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या जागेवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर सत्ताधारी महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजई अशी होणार आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय. यात अजित पवार याचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचाही समावेश आहे. मात्र याच युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना प्रचार करताना अडवण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील सोनेश्वर परिसरात त्यांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय.


नेमकं काय घडलं? 


युगेंद्र पवार 20 मार्च रोजी बारामतीतील सोनेश्वर परिसरात आले होते. यावेळी त्यांना अचाकनपणे अजित पवार यांच्या समर्थकांनी घेराव घातला. गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. या टीकेचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. यावरच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याचाच जाब विचारण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरलं होतं.


व्हिडिओ एडिट करून व्हायरल केले जातायत


तर दुसरीकडे युगेंद्र पवारदेखील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेताना दिसतायत. बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेचा व्हिडिओ एडिट करून तो विशेष रुपाने सोशल मीडियावर व्हायरल केला जात असल्याचंही यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना सांगितलं.  



पवार विरुद्ध पवार संघर्ष आणखी तीव्र


अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचे हे म्हणणे युगेंद्र पवार यांनी ऐकून घेत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुका असतील तर त्या दुरुस्त करू असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी दिले. त्यानंतर युगेंद्र पवार तेथून निघून गेले. मात्र या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.


युगेंद्र पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार


अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार चर्चेत आले. त्यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला थेट विरोध करत शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ते सध्या महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयच अजित पवार यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.