नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत कांद्याच्या मुद्द्यावरुन किरण सानप या तरुणाने जोरदार घोषणाबाजी केली होती. मोदींचे भाषण सुरु असताना थेट घोषणा देण्याची हिंमत दाखवणारा किरण सानप (Kiran Sanap) चांगलाच चर्चेत आला होता. याच किरण सानप याने शुक्रवारी नाशिकमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शरद पवार यांनी कालच या तरुणाचे जाहीरपणे कौतुक केले होते. कांदा निर्यातबंदी (Onion export ban) आणि कांद्याच्या भावामुळे नाशिकमधील शेतकरी अस्वस्थ आहेत. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी (PM Modi) आपल्या भाषणात कांद्याच्या मुद्द्याला स्पर्श करणार नसतील, तर कोणीतरी आवाज उठवणारच, असे शरद पवार यांनी म्हटले होते. 


किरण सानप हा शरद पवार गटाच्या आयटी सेलचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली होती. यावरुन भाजपने शरद पवार गटावर पलटवारही केला होता. मात्र, मोदींच्या सभेत कांद्याच्या मुद्द्यावरुन घोषणा देणारा तरुण माझ्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर आज किरण सानप याने शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रात शरद पवार आणि किरण सानप यांच्यात संवाद सुरु असल्याचे दिसत आहे. 


शरद पवारांची भेट घेतल्यानंतर किरण सानप काय म्हणाला?


पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझा फोन जप्त करून चौकशी केली. मला रात्री उशिरा मला सोडण्यात आले. विरोधक माझ्यावर टीका करतात, कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी सभेत मी कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नाहीत. 2019 पासून मी राष्ट्रवादीत काम करतो. मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो. पवार साहेबांनी काल अभिमान असल्याचे सांगितले, त्यामुळे माझा ऊर भरून आल्याची भावना किरण सानपने बोलून दाखवली. 


किरण सानपने मोदींच्या सभेत नेमकं काय केलं?


महायुतीच्या हिंदुत्त्ववादी राजकारणाच्या अजेंडाच्यादृष्टीने नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी नाशिकमध्ये सभा घेतली होती. मोदींचे भाषण सुरु असताना समोर बसलेल्या गर्दीतून किरण सानप याने 'कांद्यावर बोला' असे जोरदार आवाजात सांगितले. किरण सानपच्या आवाजामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या गोंधळात मोदींनी अगदी थोड्यावेळासाठी भाषण थांबवलेही होते. पोलिसांनी किरण सानपला पकडून बाहेर नेल्यानंतर मोदींनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली. मात्र, किरण सानप सभास्थळावरुन बाहेर पडेपर्यंत सतत घोषणा देत होता. 'आमच्या मालाला भाव द्या', 'शेतकरी सन्मान योजनेचे आमचे 6000 परत द्या','मोदीजी कांद्यावर बोला', 'शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो', अशा घोषणा देऊन किरण सानपने सभेचा परिसर दणाणून सोडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 


आणखी वाचा


पीएम मोदींच्या भाषणावेळी कांदाप्रश्नी घोषणाबाजी हा विरोधकांचा स्टंट; भारती पवारांचा पलटवार