Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. अशातच 20 मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईचाही (Mumbai News) समावेश आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये (Mumbai Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया (Voting) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडणार आहे. 


मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. 




ऐतिहासिक शिवाजी पार्कात आज महायुतीची सभा, पंतप्रधान मोदींची उपस्थिती 


महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे सव्वालाख लोक या सभेला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलंय. मैदानावर सुमारे 75 हजार खुर्चांची व्यवस्था आहे. मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. 20 मे रोजी मुंबईचे सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी आज या महायुतीची भव्य सभा मुंबईत आहे. तीन पक्षांचे कार्यकर्ते, मतदार या सभेला येतील. त्यामुळे भव्य सभा होईल अशी अपेक्षा तिनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. 




वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इंडिया आघाडीची तोफ धडाडणार 


बुधवारी (15 मे) मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींच्या भव्य रोड शोनंतर आता विरोधी पक्ष इंडिया आघाडीची देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मेगा रॅली होणार आहे. या रॅलीत विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज एकाच मंचावर दिसणार आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या रॅलीला हजेरी लावणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या रॅलीत गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य सहभागी होणार नाही.