Bharti Pawar नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (दि. 15) नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना एका शेतकऱ्याकडून कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप (Kiran Sanap) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचे समोर आले आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. 


कांदाप्रश्नी घोषणाबाजी हा विरोधकांचा स्टंट - भारती पवार 


यावर डॉ. भारती पवार म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत कांद्या प्रश्नाला घेऊन जी घोषणाबाजी करण्यात आली. तो विरोधकांचा स्टंट होता. त्यांच्यापेक्षा आम्ही कांदा उत्पादकांना न्याय दिला, निर्यात सुरु केली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान सुरु केले, ड्रायपोर्ट आणत आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे आधी सांगावे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला आहे. 


शरद पवारांकडून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे कौतुक


मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्‍यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता मोदींनी समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का हे माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे. असे कौतुक शरद पवार यांनी मोदींना कांद्यावर बोला हे विचारणाऱ्या तरुणाचे केले आहे.


कांदा प्रश्नावर काय म्हणाले पीएम मोदी? 


शेतकऱ्याच्या घोषणाबाजीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नावर भाष्य केले. कांदा स्टॉक करण्याचे काम आमच्याकडून सुरु करण्यात आले आहे. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही आतापर्यंत खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदानदेखील दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Devendra Fadnavis : एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी