Mumbai News : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तुफान टोलेबाजी केली. दिल्लीच्या संधीवरुन भास्कर जाधवांनी तटकरेंना 'शुभेच्छा' दिल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भास्कर जाधवांना थेट दिल्लीची म्हणजेच कोकणातून खासदारकी (Konkan Lok Sabha Seats) लढवण्याची ऑफर दिली. कोकणातून दोन खासदार दिल्लीत येतात, जर भास्कर जाधवांची इच्छाच असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा करु, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले? 


तटकरे आणि आपला प्रवास सारखाच असल्याचं नमूद करत, आमचा पाठशिवणीचा खेळ आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. दोघांनी सारखीच पदं भूषवली. पण आता तटकरे दिल्लीत आहे, मात्र मला दिल्लीची संधी दिसत नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.


"राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिला आहे. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार, मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री, मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलो आहोत. तुम्ही विधानपरिषद मी विधानपरिषद. पण आता दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद आहे. आजच्या घडीला व्यासपीठावरचं चित्र बघितलं तर मला संधी नाही. पण दादा म्हणाले, सुनील तटकरेंना महाराष्ट्रात बोलवा, भास्कर जाधवांना दिल्लीत पाठवा. असं मी म्हणत नाही, तटकरेंना दिल्लीसाठीच्या शुभेच्छा देतो", अशी टोलेबाजी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली. 


सुप्रिया सुळेंची ऑफर


दरम्यान, भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाधवांना खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. सुप्रिया म्हणाल्या, "कोकणातून दोन खासदार येतात. त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही मनावर घेत असाल तर तसा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत मांडण्यात येईल. दिल्लीला येण्यासाठी कोणी इच्छुक नसतं, मात्र भास्कर जाधव यांनी इच्छा व्यक्त केलीय त्यामुळे कौतुक आहे"


भास्कर जाधवांचं भाषण


भास्कर जाधव-सुनील तटकरे यांचे राजकीय वैर, अंतर्गत स्पर्धा सर्वांना माहिती आहे. नेमका हाच धागा भास्कर जाधव यांनी पकडला. त्यावर भास्कर जाधव यांनी मला गोड गोड बोलता येत नाही आणि आज गोडच बोलावं लागते. आजकाल आमचे जास्त गोड चाललं असंही वक्तव्य जाधव यांनी बोलत तटकरे यांना टोला लगावला. 


सध्या विधीमंडळात मोठ्या अडचणी आहेत. विधीमंडळातील व्यासपीठ हे वैयक्तिक बाबीसाठी मांडायचे नसते. मात्र अध्यक्ष आता खुर्चीवर येऊन बसतात आणि सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती आल्यानंतर इशारा करतो आणि मग बोलायला सुरुवात होते. सभागृहाचा दुरुपयोग होतो आहे. जयंत पाटील संयमी व्यक्ती आहे. मात्र त्यांना देखील आक्रमक व्हावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खरंतर कारवाई माझ्यावर व्हायला हवी होती. मात्र कारवाई त्यांच्यावर केली. खरंतर सभागृहात ज्याचा माईक सुरु असतो त्याचे भाषण ग्राह्य धरलं जातं. जयंत पाटील यांचा माईक बंद होता तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.


पप्पांना विचारलं का? 


दरम्यान, भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुनही टोला लगावला. आदिती तटकरेंनी निमंत्रण दिलं. मात्र मी आदितीला विचारले मला बोलवायच्या आधी पप्पांना विचारले का?  असा भास्कर जाधव म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.


VIDEO : Bhaskar Jadhav Full:सध्या आपलं गोड चाललंय, आता गोडच बोलायला पाहिजे; तटकरेंकडे पाहत जाधवांची फटकेबाजी