Maharashtra Politics गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) तोंडावर असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत निरीक्षकांच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस (Congress) उमेदवारांच्या मुलाखतीसाठी सोमवारी (दि. 14) काँग्रेस कमिटीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान चक्क पक्षाच्या निरीक्षकासमोरच काँग्रेसचे आमदार सहेशराम कोरोटे आणि खासदार नामदेव किरसान यांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण होऊन धक्काबुक्की झाल्याचे पुढे आले आहे. तर दोघांच्या समर्थकांकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. 


काँग्रेस मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर


राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. यानुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रासाठी 48 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघ येत असल्याने येथील काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती करिता  काल, सोमवार (दि. 14) निवडणूक निरीक्षक काँग्रेस नेते वेलया नाईक यांनी आमगाव येथील विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेशराम कोरोटे आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार नामदेव किरसान हे देखील उपस्थित होते. त्यातच दोघांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. क्षणातच वाद विकोपाला गेला कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद होऊन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांना धक्काबुक्की करीत  नारे दिले. या घटनेमुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले असून आमगाव विधानसभेमध्ये काँग्रेसमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तेव्हा पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आता काय निर्णय घेणार आणि कार्यकर्त्यांची कशाप्रकारे समजूत घालणार, याकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे टेंशन वाढणार


विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेसच्या आमदार आणि खासदाराच्या समर्थकांमध्ये काही दिवसांपुर्वी विधानसभेचा उमेदवारी वरून भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील पक्षाच्या बैठकीत वाद झाला होता. त्यातच आज, पुन्हा आमगावात त्याच वादाची पुनरावृत्ती झाल्याने काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. तर येत्या निवडणुकीत याचा फटका  काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नसून पक्षश्रेष्ठींचे टेंशन वाढणार आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची पकड सैल ?


गोंदियाभंडारा हे दोन्ही जिल्हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गृह जिल्हे मानले जातात, लोकसभा निवडणुकीत पटोलेंनी आपली ताकदही दाखवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत चित्र विपरीत दिसू लागले आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसची स्थिती मजबूत असली तरी तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवर गटाकडून दावा केला जात आहे. त्यामुळे काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सुर उमटत असताना काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातच आमगाव येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात जुंपल्याने पटोलेची कार्यकर्त्यांवरील पकड सैल झाली असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या