Solapur News : नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) अपक्ष अर्ज भरणारे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरुन मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाशी विश्वासघात केला, सत्यजीतला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर आता विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. महसूल मंत्री आणि नगरमधील बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. 


सत्यजित तांबे यांनी विश्वासात केल्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी टोला लगावला. विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोलेंनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. बाळासाहेब थोरतांना विचारलं पाहिजे की विश्वासघात झाला की नाही की हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहित नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. 


थोरातांचं समर्थन आहे का? 


बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीतच्या या निर्णयाला समर्थन आहे का? आणि यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की विश्वासघात केला की नाही, असा टोलाही विखेंनी लगावला. सत्यजीत यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला विचारले हे मला माहिती नाही. भाजपने जर सत्यजीत यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही, असंही विखे पाटील म्हणाले. 


सत्यजीत भाजपमध्ये आल्यास पक्षाला बळकटी 


काँग्रेसमध्ये कोणते गट आहेत हे माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय सुरु आहे मला कल्पना नाही. या सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झालेली आहे. काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेसपक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्यजीत तांबे यांची अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. सत्यजीत भाजपमध्ये आल्याने भाजपची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे नाही, कारण भाजप आधीच तिथे ताकदवान आहे. मात्र सत्यजीत तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होईल, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला. 


चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो, असंही विखेंनी नमूद केलं.


संबंधित बातमी


Nana Patole : सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं