Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्येच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ज्यामुळे काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा असेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच तिरुअनंतपूरचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. याच चर्चांवर शशी थरूर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना थरूर म्हणाले की, मला यावर भाष्य करण्याची गरज नाही.


निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात : थरूर


थरूर यांनी मातृभूमी या मल्याळम दैनिकात एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे. या लेखात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत. पक्षातील या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची एआयसीसी (AICC) आणि पीसीसी (PCC) सदस्यांना परवानगी दिली पाहिजे. शशी थरूर हे देखील काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये होते, जे पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आहेत.


थरूर यांनी लिहिले आहे की, "या कारणास्तव, मला अपेक्षा आहे की अनेक उमेदवार स्वत:चा विचार मांडण्यासाठी पुढे येतील. पक्ष आणि देशासाठी त्यांची दूरदृष्टी मांडल्याने जनहित नक्कीच जागृत होईल. संपूर्ण पक्षाला नूतनीकरणाची गरज आहे. तसेच सध्या पक्षाला सर्वाधिक गरज ही अध्यक्षांची आहे. पक्षाची सद्यस्थिती संकटाची जाणीव आणि राष्ट्रीय चित्र पाहता, जो कोणी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेल, त्याला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय करणे. मतदारांना प्रेरित करणे ही दुहेरी उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. पक्षाच्या समस्या सोडवण्याची योजना त्यांच्याकडे असायला हवी. तसेच भारताविषयीची दूरदृष्टी त्यांच्याकडे असावी. शेवटी राजकीय पक्ष हे देशसेवेचे साधन आहे.''


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक 


दरम्यान, अंतर्गत कलहाचा सामना करत असलेल्या काँग्रेसने रविवारी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले होते. अशी लोकशाही पद्धती पाळणारा हा देशातील एकमेव पक्ष असल्याचेही, पक्षाकडून सांगण्यात आले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील कोणते नेते उतरतील याबाबत अद्याप ठळक माहिती समोर आलेली नाही.