मुंबई : विधानसभा असो किंवा लोकसभा, या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पुढील प्रमुख सत्ताधारी बनण्याची संधी असते. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला भविष्यातील मुख्यमंत्री तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यास पुढील पंतप्रधान म्हणून बघितले जाते. मात्र, प्रत्येकाच्याच नशिबी ती संधी येत नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहातील म्हणजेच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या किती नेत्यांना पंतप्रधानपदाची (Prime minister) संधी मिळाली, देशाच्या राजकारणातील गेल्या इतिहास 75 वर्षांचा इतिहास काय सांगतो हेही पाहावे लागेल. नुकतेच, लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला (Om birla) यांची फेरनिवड झाली आहे, आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली. तर, विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची निवड झाली आहे. 26 जून रोजी त्यांना अधिकृतपणे लोकसभेत मान्यताही मिळाली. 9 जून 2024 पासून राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेतेपदाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, भविष्यात राहुल गांधींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल का, हे काळच सांगेल. मात्र, आजपर्यंतचा इतिहास काय आहे, हेही जाणून घेऊया.
गेल्या 10 वर्षात लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आवश्यक संख्याबळ नसल्याने गेल्या 10 वर्षांपासून रिक्त असलेल्या विरोधीपक्षनेतेपदी आता राहुल गांधींची निवड झाली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 22 वर्षांनी लोकसभा सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता निवड झाली होती. काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने विरोधी पक्षनेता निवड झाली. त्यावेळी, काँग्रेस आणि काँग्रेस (ऑर्गनायजेशन) अशा दोन काँग्रेस निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी, काँग्रेस (ऑर्गनायजेशन) चे नेते आणि बिहारमधील बक्सरचे खासदार राम सुभाग सिंह हे पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले खासदार ठरले आहेत.
महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार
सन 1969 पासून 2024 पर्यंत 12 नेत्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, तीनवेळा लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि यशवंतराव चव्हाण हे 2-2 वेळा विरोधी पक्षनेतेपदी राहिले आहेत. यांसह जगजीवन राम, सीएम स्टीफन, राजीव गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, सुषमा स्वराज यांनीही लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपद भूषवणाऱ्या 12 नेत्यांपैकी केवळ 3 जणांनाच पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये, दिवंगत राजीव गांधी, पी.व्ही. नरसिम्हा राव हे अगोदर पंतप्रधान बनले होते. या दोघांनीही पुन्हा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या दोन नेत्यांना ही जबाबदारी मिळाली होती.
ह्या तीन नेत्यांना मिळाली पंतप्रधानपदाची संधी
राजीव गांधी 18 डिसेंबर 1989 ते 23 डिसेंबर 1990 पर्यंत विरोधी पक्षनेतेपदी राहिले आहेत. त्यावेळी, व्ही.पी.सिंह हे देशाचे पंतप्रधान होते. पी.व्ही. नरसिम्हा राव 16 मे 1996 ते 31 मे 1996 म्हणजे केवळ 15 दिवसच विरोधी पक्षनेतेपदी राहिले आहेत. त्यावेळी, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. तर, अटलबिहारी वाजपेयी 21 जुलै 1993 साली विरोधी पक्षनेते बनले. त्यावेळी, देशाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिम्हा राव हे होते. दरम्यान, त्यानंतरही दोनवेळा अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, या तीन नेत्यांव्यतिरिक्त उर्वरीत 9 नेत्यांना पंतप्रधानपदी विराजमान होता आले नाही.