मुंबई: राज्याच्या राजकारणात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर अनेक नेत्यांनी  उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली, तेव्हापासून पक्षाला लागलेली गळती अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील काही नेते शिंदेंच्या पक्षात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) अनेक नेते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रत्नागिरीपासून याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता कोणते नेते ठाकरेंना सोडणार आणि एकनाथ शिंदेंसोबत जाणार याबाबतची चर्चा रंगली आहे. अशातच ज्यांना जायचं त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मांडली आहे.


कोणाला जायचे असेल त्यांनी जावे


त्याचबरोबर जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उध्दव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला सांगत असतील की या पक्षात काही राहिले नाही. तिकडे जा वगैरे, अशा लोकांचे नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बैठकीत जिल्हाधिकारी, संपर्कप्रमुखांना सूचना केल्या आहेत. कोणाला जायचे असेल त्यांनी जावे, मी निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवेल, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.


मी अर्धात सोडून मैदान सोडणारा नाही 


पक्षाला मोठं करण्यात बाळासाहेब ठाकरेंनी जे काम केलं. त्याची उदाहरणं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत दिली आहेत. ठाकरेंची साथ सोडून नेते आणि आमदार जाणार अशी चर्चा असताना उद्धव ठाकरे यांच जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर मी बाळासाहेबांना वडील म्हणून आणि पक्ष प्रमुख म्हणून ओळखत होतो, ते ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार, ही लढाई अशी मी अर्धात सोडून मैदान सोडणारा नाही असंही पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 


उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याचा पहिला टप्पा रत्नागिरीत होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. रत्नागिरीतील काही माजी आमदार ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे.