मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे पक्षावर नाराज आहेत. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांचा रोष आणखीनच वाढला आहे. त्यामुळे संजय निरुमप यांनी उघडपणे काँग्रेसच्या (Congress) धोरणांवर टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेतृत्त्वाकडून संजय निरुपम यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. येत्या काही तासांमध्ये संजय निरुपम यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तसेच संकेत दिले आहेत.


नाना पटोले यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही संजय निरुपम यांचे लोकसभा निवडणुकीसाठीचे स्टार प्रचार म्हणून निश्चित करण्यात आलेले नाव रद्द केले आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संजय निरुपम काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनी एक ट्विट करुन त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. संजय निरुपम यांची ट्विटमधील भाषा पाहता ते काँग्रेस पक्षात फारकाळ राहणार नाहीत, असे दिसत आहे. मात्र, काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर संजय निरुपम महायुतीमधील कोणत्या पक्षात जाणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.


 




नाना पटोलेंचं वक्तव्य आणि संजय निरुपमांचं तोऱ्यात प्रत्युत्तर 


नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनी तातडीने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त उर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. अगोदरच काँग्रेस पक्ष भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण होत आहे. उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन, असे संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


मुंबईतील बड्या काँग्रेस नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी


गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार प्रिया दत्त यादेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामध्ये आता संजय निरुपम यांची भर पडण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण