धुळे : भाजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Lok Sabha Election) विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भामरे यांच्या उमेदवारीनंतर त्यांचे धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाने तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचे सोने करू, अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली


गेल्या दहा वर्षात या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्याचा आपण कायमच प्रयत्न केला, या ठिकाणची 90 टक्के कामे पूर्ण केली असून उर्वरित दहा टक्के कामे येत्या काळात नक्कीच पूर्ण करू, तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा नारपार योजना देखील पूर्णत्वास नेऊ असं सुभाष भामरे म्हणाले.


देशाला मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करणे गरजेचे असल्याचं मतदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आमच्यासमोर कुठल्याही इंडिया आघाडीचे आव्हान नसल्याची प्रतिक्रिया डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी व्यक्त केली.


कोण आहेत सुभाष भामरे? (Who Is Subhash Bhamre)


डॉ. सुभाष भामरे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1953 रोजी झाला. कर्करोग तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. 1995 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस, शिवसेना, आणि आता भाजप हा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2004 साली धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून सुभाष भामरे यांनी निवडणूक लढवली होती. यानंतर 2014 साली भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवली होती. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विजय झाला होता. 


उच्चशिक्षित उमेदवार तसेच मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम डॉ. सुभाष भामरे यांनी 2019 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सुरू केले आहे. मतदारसंघातील प्रश्न तातडीने सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो. डॉ. सुभाष भामरे हे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं बोललं जातंय. डॉ. सुभाष भामरे यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या काँग्रेसचे श्यामकांत सनेर किंवा मालेगाव येथील डॉ. तुषार शेवाळे यांचे तगडे आव्हान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


ही बातमी वाचा :