पुणे : बड्या बापाच्या लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचं आता पोलिस (Police) तपासातून समोर आलंय. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून राजकीय नेतेमंडळीही याप्रकरणात हस्तक्षेप करत होते. त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमव समाज माध्यमांच्या दबावानंतर आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे. त्यातच, पोलिसांनी ब्लड सॅम्पलप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. तर, आमदार सुनील टिंगरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत.


पुणे अपघात प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत असून एकापाठोपाठ एक अशी अनेक नावे आरोपी म्हणून समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या तपास कार्याला गती मिळाली असून याप्रकरणी ससूण रुग्णालयातील 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अजय तावरेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर, आमदार सुनील टिंगरे यांना फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फोन उचलत नाहीत. 


डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. सुनील टिंगरेंचे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. विशेष म्हणजे या पत्रानंतर अजय तावरेंना रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्तीही देण्यात आली होती. मात्र, गेल्याच महिन्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. अजय तावरेंची डीन पदावरुन हकालपट्टी केली आहे. पण, आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीनंतरच अजय तावरेंना ससूण रुग्णालयाचे डीन केल्यामुळे आमदार टिंगरे हे पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण, डॉ. तावरें या प्रकरणाता आता आरोपी बनले आहेत.


टिंगरे देवदर्शनासाठी बाहेर


पोर्शे अपघात प्रकरणात अटकेत असणारे डॉक्टर अजय तावरेंमुळं अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पुन्हा अडचणीत आले आहेत. तावरेंना डीन पदी रुजू करण्यासाठी टिंगरेंनी शिफारस पत्र दिल्याचं आणि मंत्री हसन मुश्रीफांनी त्यावर शेरा मारल्याचं पत्र सार्वजनिक झालं आहे. त्यानंतर एबीपी माझाने आमदार टिंगरेंना संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यांच्या बंगल्यावर जाऊनही पाहिलं, त्यावेळी टिंगरे कुठं आहेत अशी विचारणा केली असता ते देवदर्शनासाठी बाहेर गेले असल्याचं सांगण्यात आलं.


ब्लड सॅम्पल फेरफारीचे तावरेंना कोणी सांगितले?


महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. 29 डिसेंबर 2023 रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर, हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यामुळे, तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरुन ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.